

सुरेश गायकवाड
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मानाच्या पालखी सोहळ्यासह सर्व पालख्या, दिंड्या व लाखो वारकरी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. रविवारी (दि. १९) माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे आगमन होईल. सोमवारी (दि. २०) अकलूज येथे तुकोबारायांच्या पालखीचे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी शासन व प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.
सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे माऊली पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा. प्रणिती शिंदे, आ. उत्तम जानकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माळशिरसच्या उपविभागीय अधिकारी विजया पांगरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, तहसीलदार सुरेश शेजुळ, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पालकमंत्र्यांकडून पाहणी
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन होणार आहे. पालखी समवेत लाखो वारकरी भाविक पायी येतात. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज धर्मपुरी, पुरंदावडे, नातेपुते, माळशिरस, सदाशिवनगर, वेळापूर व भंडी शेगाव, वाखरी येथील पालखी मुक्काम, विसावा व रिंगणाच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. शासन व प्रशासनाच्या वतीने वारकरी-भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, फिरती शौचालये व पिण्याच्या पाण्याच्या टँकर व्यवस्थेची पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने सर्व ठिकाणी वारकऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा तसेच औषधे याचीही माहिती घेतली.