

पानीव : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण मंगळवारी सकाळी उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. “ज्ञानोबा-तुकाराम... माऊली... माऊली...” अशा आकाशाला गवसणी घालणाऱ्या जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या अखंड निनादाने, डौलाने फडकणाऱ्या भगव्या पताकांनी, हरिनामाच्या गजराने आणि माऊलीच्या अश्वाच्या पायाखालची माती मस्तकी लावण्यासाठी झालेल्या भक्तांच्या झुंबडीने माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा (पानीव पाटी) परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
लाखो वारकरी आणि भाविकांनी हा नेत्रदीपक रिंगण सोहळा अनुभवला. त्यानंतर रंगलेले पारंपरिक खेळ आपल्या नयनात आणि मनात कायमचे साठवून ठेवले. माळशिरस येथील मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सकाळी वेळापूरच्या दिशेने प्रस्थान करताच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.
सर्वात पुढे भगव्या पताका खांद्यावर घेतलेले पताकाधारी वारकरी, त्यांच्या मागोमाग टाळकरी, वीणेकरी, तुळशीधारक, हंडे वाहणाऱ्या महिला आणि शिस्तबद्ध दिंड्या “पायी हळूहळू चला, मुखी विठ्ठल बोला” म्हणत विठुरायाच्या भेटीची आस मनात ठेवून पुढे सरकत होत्या. अभंग, हरिपाठ आणि विठ्ठलनामाच्या गजरात वारीचा क्षण भक्तिमय झाला होता.
वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले
सकाळी ९.४५ वाजता मुख्य गोल रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. चोपदारांनी विधिपूर्वक अश्वाला रिंगण दाखविल्यानंतर सर्वांच्या नजरा माऊलीच्या अश्वाकडे खिळल्या. काही क्षणांतच माऊलीच्या अश्वाने भरधाव वेगाने मैदानाला सलग पाच दिमाखदार फेऱ्या पूर्ण केल्या. प्रत्येक फेरीबरोबर “ज्ञानोबा-तुकाराम”, “माऊली... माऊली...” या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा अखंड गजर आणि वारकऱ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात हा सोहळा अधिकच रंगत गेला.