

वेळापूर : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखीचा माळशिरस मुक्कामानंतर दि. 2 रोजी खुडूसचे गोल रिंगण झाले. निमगाव पाटी येथे दुपारच्या विसाव्यानंतर सायंकाळी वेळापूरच्या श्री अर्धनारी नटेश्वराच्या नगरीमध्ये हरिनामाच्या गजरात विसावला. पालखी सोहळा वेळापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत ठिक 3 वाजता पोहोचल्यानंतर सरपंच रजनीश बनसोडे, ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे, उपसरपंच बापूसाहेब मुंगूसकर यांच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.
ढगाळ वातावरण, ऊन, वारा कधी पावसाच्या सरी, झेलत अधूनमधून पावसाच्या छोट्या सरी झेलत, वारकर्यांची पावले विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने धुमाळी या ऐतिहासिक उतारावरुन धावा करीत हा सोहळा विसाव्याच्या ठिकाणी 3 वाजून 36 मिनिटांनी पोहोचला. यानंतर ग्रामस्थांनी माऊलींची पालखी रथातून विसावा कट्टा याठिकाणी ठेवण्यात आली. याठिकाणी सेवेकरी ह.भ.प. महादेवभाऊ ताटे, दादासाहेब ताटे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
या विसावा कट्टा याठिकाणी भारूडाचा मान असून पारंपरिक मानाचे भारूड, अभंग सादर केले. यानंतर पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर उचलून घेऊन ‘माऊली...माऊली’च्या गजरात पालखीतळाच्या मुक्कामी 4 वा. 50 मिनिटांनी पालखी चौक येथे पोहोचला. याठिकाणी आमदार उत्तमराव जानकर, सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, ग्रामविकास अधिकारी कैलास सुरवसे, दादासाहेब राजेघाटगे, संजय देशपांडे, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, संदीप माने-देशमुख, भाऊसाहेब जानकर, दादासाहेब तुपे यांच्याकडून स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावलेली श्री विठ्ठलाची मूर्ती व डिजिटल रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, पालखीतळ येथे लावण्यात आलेले आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेतले. माऊलींचा पालखी सोहळा मुख्य तळावर विसावल्यानंतर दैनंदिन माऊलींच्या पादुकांची आरती करण्यात आली. यानंतर भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली.