Ashadhi Wari: पहिल्या उभ्या रिंगणाने माळीनगर विठ्ठलमय

मानाच्या अश्वाच्या नेत्रदीपक दौडीने हजारो वारकरी भारावले, टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीचा महासागर उसळला
Ashadhi Wari: पहिल्या उभ्या रिंगणाने माळीनगर विठ्ठलमय
Published on
Updated on
गोपाळ लावंड

माळीनगर : माळीनगर येथे जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण मंगळवारी, दि. २१ जुलै रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास माळीनगर येथे अभूतपूर्व आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. पालखी महामार्गावरील रिंगणस्थळी मानाच्या अश्वाने घेतलेल्या नेत्रदीपक दौडीने हजारो वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. टाळ-मृदंगाचा अखंड निनाद, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर आणि विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण माळीनगर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

पंधरा दिवसांपासून पंढरपूरच्या दिशेने अखंड हरिनाम घेत मार्गक्रमण करणारा वारकरी संप्रदाय माळीनगरमध्ये दाखल होताच भक्तीचा महासागर उसळला. माळीनगर पालखी महामार्गावर झालेल्या उभ्या रिंगणात मानाच्या अश्वाने घेतलेली भरधाव दौड पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अश्व रिंगणात धावताच “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला आणि प्रत्येक वारकरी तो अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यांत साठवून ठेवत होता. कपाळी अष्टगंध, गळ्यात तुळशीमाळ, हातात टाळ-मृदंग आणि मुखी विठ्ठलनामाचा अखंड गजर अशा वातावरणात संपूर्ण माळीनगर विठ्ठलमय झाले होते.

पालखी स्वागतासाठी माळीनगर ग्रामपंचायत, दि. सासवड माळी शुगर फॅक्टरी, महात्मा फुले पतसंस्था, शुगरकेन सोसायटी, विविध सामाजिक संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दि. सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांचे विधिवत पूजन पालखी पूजन व अभिषेक माळी शुगर चे संचालक गणेश इनामके व भारती इनामके या उभयतांनी केले.

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळीनगर ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, माळी शुगरचे विविध विभाग, पोलीस प्रशासन तसेच स्वयंसेवकांनी भाविकांच्या सोयीसाठी उत्कृष्ट नियोजन करून चोख व्यवस्था राखली. त्यामुळे संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news