

पंढरपूर : आषाढी वारीचा एकादशीचा मुख्य सोहळा दि.२५ जुलै रोजी साजरा होत आहे. या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात येणार आहेत. भाविकांना यात्रेच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पंढरपूर शहर व परिसरामध्ये रस्ते, जोडरस्ते तयार करणे, डांबरीकरण करणे, खड्डे बुजविणे, चंद्रभागा घाट परिसर व पादचारी मार्गाची सुधारणा, संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. भाविकांची सुरक्षित व सुलभपणे मजबूत रस्त्यावर पावले पडणार आहेत. या दृष्टिने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
बांधकाम विभागाकडून वाखरी पालखी येथील दोन ठिकाणी मुरमीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्टाकडे जाणारा रस्ता व सुलभ शौचालयाकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, अंबाबाई पटांगण, खादी ग्राम उद्योग येथील पार्किंग व्यवस्था, भक्ती सागर ६५ एकर याठिकाणचे मुरमीकरण, गोपाळपूर चौक ते रेल्वे पीएनआर रोडपर्यंत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते ब्लड बँक चौक या ठिकाणचे खड्डे भरून पूर्ण करणे, चंद्रभागा नदीपात्र तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सर्व दिशादर्शक फलकांची माहिती पूर्ण करून बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
भक्ती सागर ६५ एकर शेगाव दुमाला येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती शिल्प उभारणे, यमाई तुकाई मंदिर चौक येथे वारकरी वाद्यांचे शिल्प उभारणे ही कामे प्रगतीपथावर आहेत. भक्तिमार्ग गोपाळपूर ते सांगोला चौक कराड रस्त्याच्या दुभाजकास रंगकाम करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर इतर ठिकाणचे काम प्रगतीपथावर आहे.
तसेच अमळनेरकर महाराज मठ परिसरातील डांबरी रस्ते, सिमेंट काँक्रीट रस्ते पूर्ण झाले आहेत. धुंडा महाराज मठ रस्ता पूर्ण झाला आहे. चंद्रभागा घाट ते दर्शन मंडप धुंडा महाराज देगलूरकर मठ परिसरातील मलनिस्सारण व्यवस्थचे काम पूर्ण करण्यात आले. आवश्यक ठिकाणी मुरुमीकरण, साफसफाई करण्यात आलेली आहे. तसेच ६५ एकरातील रस्ता व दगडीपूल जोड रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. खडीकरण करुन त्यावर डस्ट टाकण्याचे काम करण्यात येत आहे.