

सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बार्टीच्या वतीने वारीत संविधान दिंडी उपक्रम राबवण्यात आले. दिंडीत आयोजिलेल्या संविधान जागर सोहळ्याची पंढरपुरात सांगता झाली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर या असा 19 दिवसांच्या प्रवासादरम्यान संविधानाचे मूल्य, अधिकार आणि प्रस्ताविकेचे महत्त्व वारकर्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.
दिंडीत समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्य, प्रश्नमंजुषा, प्रस्ताविकेचे वाटप आणि संविधान जागृतीबाबतचे विविध कार्यक्रमही राबवण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाठ, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे तसेच बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे पुणे, सातारा व सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून प्रवास झाला असून वारीतील विठ्ठल भक्तांना संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बार्टी संस्थेचे निबंधक इंदिरा आस्वार, नसरीन तांबोळी, प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, किरण वाघमारे, नालंदा शिंदे, अश्विनी सुपाते, ज्योती ओहळ, मुकुंद लोंढे, कृष्णा आळंदकर, अतीश बेंद्रे यांच्या माध्यमातून वारीतील संविधान दिंडी यशस्वी झाली आहे.