Ashadhi Wari | मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

आषाढी यात्रेची मंदिर समितीकडून तयारी पूर्ण; 20 ते 25 लाख भाविक येण्याचा अंदाज
Ashadhi Wari |
Ashadhi Wari | मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शनFile Photo
Published on
Updated on
सुरेश गायकवाड

पंढरपूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस... प्रथेप्रमाणे पंढरीस वारी पोहोच करण्याची पिढ्यानंपिढ्याची परंपरा... अशा सर्व सकारात्मकतेमुळे यंदा आषाढी यात्र सुमारे 22 ते 25 लाख भरेल, असा अंदाज पंढरपुरात व्यक्त होत आहे. या दरम्यान, प्रत्येक मिनिटाला सुमारे साठ भाविकांना विठुरायाचे दर्शन होईल. अशा पद्धतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नियोजन केले आहे.

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा दि. 6 जुलै रोजी साजरा होत आहे गतवर्षीपेक्षा यावर्षी यात्रा मोठी भरण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन भाविकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्यासाठी तयारी सुरू आहे.

सध्या मंदिर समितीकडून तिरुपती बालाजीच्या धर्तीवर टोकन दर्शन पास देऊन भाविकांना जलद दर्शन देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. टोकन दर्शनाची 15 ते 26 जून या कालावधीत चाचणी घेण्यात येत आहे. 1800 भाविकांना दररोज टोकन पास दर्शन मिळत आहे. मात्र, आषाढी यात्रा कालावधीत भाविकांची दर्शन रांगेतील गर्दी विचारात घेता टोकन दर्शन चाचणी थांबवण्यात येणार आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दि. 27 जून पासून 24 तास श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुरू करण्यात येत आहे.

दरम्यान, दि. 17 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंदिर समितीकडून शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यात आले आहे. दि. 6 जुले रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पहाटे पार पडणार आहे. दर्शन रांगेतील भाविकांना तासोनतास दर्शन रांगेत ताटकळत बसावे लागते. यामुळे भाविकांचे हाल होऊ नयेत म्हणून दर्शन रांगेत शुद्ध पाणी, चहा, नाश्ता, प्रथमोपचार सुविधा, शौचालये, सीसीटिव्ही, पोलीस संरक्षण पुरवण्यात येत आहे.

बुंदीचे 12 लाख लाडू तयार करण्याचे काम

आषाढी यात्रेला येणार्‍या भाविकांकडून श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूला जास्त मागणी असते. याचा विचार करून मंदिर समितीने बुंदीचे 12 लाख लाडू तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. उच्च दर्जाचे लाडू तयार करण्यात येत आहेत. तसेच एकादशी दिवशी भाविक, वारकर्‍यांचा उपवास असल्याने राजगिरा लाडू देखील प्रसाद म्हणून असणार आहेत.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभार्‍यावरील कळसास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे भाविक कळस दर्शना बरोबर विद्युत रोषणाईचा आनंद घेत आहेत. रात्रीची ही दृश्य डोळ्यांची अक्षरशः पारणे फेडणारी आहेत.

चंद्रभागा नदीत असणार जीवरक्षक दहा बोटी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी गेलेल्या भाविकांना स्नान करताना सुरक्षा मिळावी म्हणून जीवरक्षक टीम नदी पात्रात तैनात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने जीवरक्षक 10 बोटी सेवेस तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत.

व्हीआयपी वाहनांना मंदिर परिसरात बंदी

यंदा व्हीआयपी वाहनांच्या ताफ्यांना मंदिराकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. यंदा व्हीआयपी वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थ येथे पार्किंग करण्यात येणार आहेत. तेथून व्हिआयपींना मंदिर समितीच्या इलेक्ट्रिक वाहनांमधून ने आण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. यात्रेत येणार्‍या भाविकांना जलद दर्शन मिळावे म्हणून व्हीआयपी दर्शनावर देखील मर्यादा घालण्यात आली आहे. दि.27 पासून 24 तास दर्शन सुरू राहणार असल्याने टोकन दर्शन पास, ऑनलाइन बुकिंग दर्शन व्यवस्था बंद राहणार आहे.

दर्शन रांगेत असणार सोईसुविधा

आषाढी यात्रेत दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी पदस्पर्श व मुख दर्शन अशा दोन्ही दर्शन व्यवस्था मंदिरात उभारण्यात आलेल्या आहेत. दर्शन रांगेतून आलेला भाविक श्री विठ्ठल व रुक्मिण मातेचे दर्शन करूनच बाहेर पडेल. मंदिरात आल्यानंतर भाविकांना उकाडा जाणवू नये म्हणून कुलर, एसी, फॅनची हवा मिळणार आहे. मंदिर समितीचे सुरक्षा रक्षक दर मिनिटाला शंभर भाविकांना दर्शन देण्याचा प्रयत्न करतील. यावेळी भाविकांची नाराजीही ओढवली जाणार नाही, याचीही दक्षता मंदिर समिती घेत आहे.

यंदा 12 दर्शन मंडप

आषाढी वारींच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शन रांगेत दरवर्षी 10 शेड असतात. मात्र यंदा वारी मोठी भरण्याचा अंदाज घेत प्रशासनाने यात वाढ करून अत्याधुनिक पद्धतीचे 12 पत्राशेड उभारण्यात येत आहेत. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या दर्शनरांगेत श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप पासून कासार घाट पर्यंत 220 मीटर लांबीचा स्कायवॉक, स्कायवॉक ते पत्राशेड पर्यंत वासे व बांबूचे बॅरीकेटींग करण्यात आले आहे. यात्रेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पूर्व तयारी झाली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

आषाढी यात्रेला येणार्‍या वारकरी, भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना सुलभ व जलद दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक भाविकाला पदस्पर्श दर्शन मिळावे यासाठी यात्रा काळात दर मिनिटाला किमान 60 भाविक दर्शन घेतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी जे जे काही करता येईल, ते करण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न आहे.
- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news