Ashadhi Wari 2025 | मानाच्या पालख्यांसाठी 100 रुग्णवाहिका देणार सेवा

भाविकांच्या वैद्यकीय मदतीसाठी खास अ‍ॅपची निर्मिती; कार्डियाक सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचाही समावेश
Ashadhi Wari 2025 |
पंढरपूर : येथे रुखमाई सभागृह पोलिस संकुलात सीपीआरबाबतचे प्रात्यक्षिक करुन दाखवताना प्रशिक्षक डॉ. साक्षी पोटदुखे, डॉ. वैभव भिंगारे.Pudhari Photo
Published on
Updated on

पंढरपूर : आषाढीवारीसाठी पालखी सोहळ्यासोबत पायी चालत येणार्‍या वारकरी भाविकांसाठी शासनाचा 108 अत्यावश्यक वैद्यकीय सेवा विभाग व राज्य आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा उभारली आहे. यंदा प्रथमच 10 मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत 100 पेक्षा अधिक रुग्णवाहिका सज्ज करण्यात आल्या आहेत. काही रुग्णवाहिका कार्डियाक (हृदयविकारग्रस्तांसाठी) सुविधा असलेल्या रुग्णवाहिकांचा यात समावेश आहे.

यंदा आषाढी वारीमध्ये सहभागी होणार्‍या प्रत्येक रुग्णवाहिकेत एक डॉक्टर व चालक सज्ज राहणार आहे. त्यांच्याजवळ अत्यावश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध राहणार आहे. देहू ते पंढरपूर (जगद्गुरु संत तुकाराम महाराज), आळंदी ते पंढरपूर (संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज), सासवड ते पंढरपूर (संत श्री सोपानकाका महाराज) आणि इतर सात मानाच्या पालख्यांबरोबर 108 रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती सोलापूर जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे यांनी दिली.

आरोग्य विभागाने यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत ‘समारिटन’ नावाचे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वारकर्‍यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे. अ‍ॅपवर आलेल्या माहितीवरून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण अचूक कळणार. यामुळे वारीतील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी होण्यास मदत होणार आहे. ‘समारिटन’ हे अ‍ॅप शासनाच्या आरोग्य विभाग आणि एसपीईआरओ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आले आहे.

अ‍ॅपल स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून ते मोफत डाऊनलोड करता येते. या अ‍ॅपमुळे केवळ रुग्णवाहिकेशी संपर्कच साधता येणार नाही, तर प्राथमिक उपचाराची माहितीही यामध्ये दिली आहे. त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचण्यापूर्वी रुग्णाला काही आवश्यक मदत दिली जाऊ शकते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व 108 चे मुख्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वारकरी-भाविकांना पालखी मार्ग, तळांवर तसेच पंढरपूर शहरात आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचेही डॉ. काळे यांनी सांगितले.

पंढरपूर येथे रुखमाई सभागृह पोलिस संकुलात ‘समारिटन’ मोबाईल अ‍ॅप तसेच कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन (सीपीआर) याबाबतचे प्रशिक्षण पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, पोलिस निरिक्षक विश्वजित घोडके, पुणे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे, प्रशिक्षक डॉ. साक्षी पोटदुखे, डॉ. वैभव भिंगारे, 108 चे सहा. व्यवस्थापक सुनील चव्हाण, दिलीप शिंदे तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news