

सोलापूर : शहरात मध्यवस्तीतील अवंतीनगर या गजबजलेल्या भागात दोन घरांत सशस्त्र चोरी करण्याचा प्रयत्नाचा प्रकार शनिवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास घडला. पोलीस कंट्रोलला फोन आल्यानंतर फौजदार चावडीचे पोलिसांचे गस्तीचे पथक दहा मिनिटात त्याठिकाणी आले त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला.
शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास अवंती नगर येथील पूजा अन्नदाते आणि स्नेहा रजपूत यांच्या घरात चार चोरटे शस्त्रानिशी घुसले. अन्नदाते यांच्या शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरातील नागरिकांना धमकावत सोने आणि पैशाची मागणी केली. घरातील लहान मुलाच्या गळ्यावर चाकू लावून सोने कुठे आहे अशी विचारणा केली. संपूर्ण कपाट उचकले. अन्नदाते यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ते घेऊन गेले. त्यानंतर रजपूत यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. रजपूत यांना मारहाण करीत कपाट तोडून त्यातील सोने आणि रोख रक्कम घेतली.
दोन्ही कुटुंबातील दोन तोळे सोने तसेच रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. तब्बल अर्धा तास हा प्रकार सुरू होता. चोरट्यांचा हा धुमाकूळ सुरू असताना त्यांनी कंट्रोल रुमला फोन केला. त्यामुळे दहा मिनिटात फौजदार चावडी पोलिसांचे गस्ती पथक तेथे आले यामुळे चोरट्यांनी पळ काढला. सकाळी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. आश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. त्यानंतर डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली. याबाबत फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर करीत आहेत. या चोरट्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
अर्धातास सुरू होता प्रकार
पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी माहिती देताना सांगितले, आम्ही गाढ झोपेत असताना मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक काही लोक घरात घुसले. त्यांनी धमकावत सोने आणि पैशाची मागणी केली. गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. मुलाच्या गळ्याला चाकू लावून धमकावलं. पतीला मारहाण करत घरातील सोनं व रोख रक्कम लुटली. त्यानंतर ते चोरटे खालच्या घरात गेले आणि तिथेही तसंच केलं. हा संपूर्ण प्रकार अर्धा तास सुरू होता.