

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरण (ता. माढा) येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी मंदिर, या तीर्थक्षेत्रास ‘अ’ वर्ग दर्जा देऊन तीर्थक्षेत्र विकसित करण्याची घोषणी केली होती. गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 150 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली.
या मंजूर आराखड्यामध्ये सभा मंडप, भक्तनिवास व अन्नछत्र, संतसृष्टी म्युझियम, दर्शन मंडप, स्वच्छतागृह, छत असलेली मार्गिका, देवस्थान प्रशासकीय कार्यालय, बस स्टॉप, मुख्य मंदिर जीर्णोद्धार व सुशोभीकरण, श्री विठ्ठल आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज ब्राँझ पुतळा, स्कायवॉक, पाण्याची टाकी, जुनी विहीर जीर्णोद्धार व सुशोभीकरण, म्युझियम मीडिया रंगकाम व भिंती चित्रे, कमान व वाहनतळ, पालखी तळ सुधारणा, भूमीरचना (हार्डस्केप) व सौंदर्यकरण, पोच मार्ग सुधारणा, पाणी पुरवठा व ड्रेनेजलाईन, जलपुनर्भरण, कचरा संकलन प्रणाली, साईन बोर्ड/दिशादर्शक कार्यालय, विद्युतीकरण, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. याबाबतचे उचित शासन निर्णय आदेश सत्वर निर्गमित करण्यात येत आहे.
हा विकास आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आराखडयाच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागामार्फत शासन स्तरावर विशेष पाठपुरावा केला. तसेच इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांचेही योगदान लाभले.