

सोलापूर : सोलापूर शहरासाठी विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या होटगी येथील नियोजित आयटी पार्कला मंगळवारी 9 डिसेंबर रोजी मुंबई येथील उच्चाधिकार समितीने मंजुरी दिली असून, येत्या 15 डिसेंबरच्या आत त्याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ जारी करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सोलापुरात आयटी पार्क उभे करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परिपूर्ण असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. आयटी पार्क करण्यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च येणार असून, त्यासाठी होटगी येथील तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेवर हा पार्क उभारला जाणार आहे. या आयटी पार्कमुळे सूमारे 40 हजार अभियंत्यांना सोलापुरात नोकरीची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्वस्तात वीजपुरवठ्यासाठी प्रयत्न
आयटी पार्कसाठी एनटीपीसीकडून स्वस्तात केवळ तीन रुपयापर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे नियोजित आयटी पार्क आतापासूनच आयटी क्षेत्रासाठी खुणावत आहे. दीड वर्षांत आयटी पार्कची इमारत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने सोलापुरातील युवकांत आता मोठे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.
विमानतळ प्रशासनाचा घेतला अभिप्राय
विमानतळावरुन उडणाऱ्या विमानसेवेच्या फनेलमध्ये प्रस्तावित आयटी पार्क इमारतीचा समावेश होत नाही. 60 मीटर उंचीपर्यंत बांधकाम करता येते. याबाबत होटगी रोडवरील विमानतळ प्रशासनाचा अभिप्राय घेण्यात आला आहे. तसेच होटगी येथील प्रस्तावित आयटी पार्क जागेच्या 50 एकरावर सुमारे 40 ते 45 हजार जण बसून काम करतील इतकी क्षमता असणार आहे. पुण्याच्या हिंजवडीपेक्षा किमतीने स्वस्तात होटगी येथे जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे आता आयटी पार्कचे सोलापूरकरांचे स्वप्नही लवकरच साकार होणार आहे.
पार्कसाठी 50 एकर जागा सुपूर्द
आयटी पार्कसाठी सुरुवातीला हिरज, कुंभारी, जुनी मिल, होटगी येथील जागेची पाहणी करण्यात आली होती.. यात होटगी येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. होटगी येथे जलसंपदा संपदा विभागाच्या मालकीची लॉजिस्टिक पार्कसाठी देण्यात आलेली 50 एकर जागा आता आयटी पार्कसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दै. ‘पुढारी’चा पाठपुरावा
सोलापुरात आयटी पार्क व्हावे, यासाठी दै.‘पुढारी’ने वारंवार पाठपुरावा केला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. आयटी पार्कमुळे सोलापुरात होणारे विकासात्मक बदल, सोलापूर शहरात असलेली तरुणांची गुणवत्ता याबाबतचे सकारात्मक मुद्दे वृत्तांतामधून दै.‘पुढारी’ने मांडली होती.