

सोलापूर : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 3) ऑगस्ट रोजी जल्लोषी मिरवणुकीतून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. यंदा रात्री 10 ऐवजी 12 वाजेपर्यंत डीजेला परवानगी मिळाल्याने तरुणाईचा जल्लोष शिगेला पोहोचला होता. एकूण 55 मंडळांनी मिरवणुकांमध्ये सहभाग घेतला.
तब्बल आठ तास ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका शहरातून फिरल्या. जय मल्हार चौक, कुमठा नाका, पाथरूड चौक, लष्कर, बोरामणी नाका यांसारख्या प्रमुख भागातून मिरवणुका अण्णा भाऊ साठे पुतळाकडे मार्गस्थ झाल्या. यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक उत्तमप्रकाश खंदारे आणि अध्यक्ष शांतीलाल साबळे व समितीकडून पुतळ्याला अभिवादन केले. मिरवणुकींमध्ये विविध मंडळांनी अण्णाभाऊंच्या कार्यावर आधारित आकर्षक देखावे सादर केले. या देखाव्यांमधून त्यांच्या साहित्यातील कथा, सामाजिक कार्य आणि संघर्षमय जीवन यांचा आढावा घेण्यात आला.