

सोलापूर : माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी बोरामणी गटातून माघार घे नाही तर तुला गोळ्या घालतो, अशी धमकी दिल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या महिला संपर्कप्रमुख तथा उमेदवार अनिता माळगे यांनी केला. तर तिकीट मिळाले नसल्यानेच माळगे या खोटे आरोप करीत असल्याचा दावा सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तिकीट वाटपावरून सर्वच पक्षांत वादविवाद सुरू असल्याचे दिसते. शिवसेना शिंदे गटातही तिकीट वाटपावरुन चांगलेच रणकंदण माजले आहे. बोरामणी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार असलेल्या शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख अनिता माळगे यांनी थेट माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्यावर आरोप केले आहेत. मोबाईलवर गेमचेंजर हे स्टेटस ठेवल्याने त्यांना राग आला असून बोरामणी गटातून माझी उमेदवारी फिक्स असताना ती कापण्यात आली. यामध्ये म्हेत्रे यांच्याबरोबर संपर्क प्रमुख महेश साठे यांचा हात आहे. दुधनीत आल्यानंतर तुला गोळ्या घातलो असतो अशी धमकी सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिल्याचा आरोप माळगे यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या तिकिटासाठी ग्रीन सिग्नल दिला होता असा दावा अनिता माळगे यांचा आहे. मात्र आपल्याला तिकीट मिळू नये यासाठी सिद्धराम म्हेत्रे हे दबाव आणत आहेत असा आरोप करत याबाबत पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा माळगेंनी केला.
म्हेत्रेंनी फेटाळले आरोप
माजी गृहराज्य मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. मी कोणतीही धमकी दिलेली नाही. बोरामणी गटातून दुसरा सक्षम नेता असल्याने तिकीट देता येणार नाही. तिकीट मिळणार नसल्याने अनिता माळगे खोटे आरोप करत असल्याचे स्पष्टीकरण म्हेत्रे यांनी दिले आहे. शिवसेनेतील या वादाचे परिणाम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत होण्याची चिन्हे आहेत.