

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
परिते तालुका माढा येथील भूमिहीन शेतमजूर असणाऱ्या नितीन माळी याने बेंबळे हद्दीतील इस्माईल सय्यद यांचे शेत बटईने केले. सध्या केळीला चांगला भाव असल्याने एक वर्षांपूर्वी केळीची लागवड केली. व्याजाने पैसे काढून केळीची रोपे, खते हा सर्व खर्च केला. मेहनतीने व नियोजनपूर्वक केळीची बाग उत्तम रीतीने उभा राहिली.
केळीची बाग हार्वेस्टिंगला आली असता व्यापारी लोकांची वर्दळ वाढली. सहा सात टन केळी पंचवीस रुपये किलो भावाने विकली. राहिलेल्या मालाचाही भाव पंचवीस रुपये किलोने ठरला होता.
दरम्यान 11 फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत भैरवनाथ यात्रा गावामध्ये होती. त्यामुळे शेतातील सर्व कामे आटोपून संध्याकाळी सहा वाजता सर्व माळी कुटुंबीय घरी गावात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन माळी शेतात गेले असता आपल्या केळीचे झालेले नुकसान त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना परिस्थिती दाखवली. अंदाजे सहा ते सात लाखाचे नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास असा अज्ञात व्यक्तींच्या दशकृत्याने हातचा गेल्याने माळी कुटुंबीय पुरते घाबरून गेले आहे.
सदर घटनेची फिर्याद नितीन माळी यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या टीमने नुकसान झालेल्या बागेचे पाहणी करून पंचनामा केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
परीते परिसरातील शेळ्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात चालू असताना वारंवार तक्रार करूनही कोणत्याही चोरीचा तपास अद्याप पोलीस स्टेशनकडून लागलेला नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडत चाललेला आहे. शेतकऱ्याच्या होणाऱ्या अशा नुकसानीचा तपास पोलिसांनी करावा व शेतकऱ्याला सहाय्य करावे अशी चर्चा परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.