

पंढरपूर : पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पवार कुटुंब एकत्रित यावे व गुण्यागोविंदाने नांदावे. नववर्ष सर्वांना सुख-समृद्धीचे जाऊ दे. अजित पवार आणि शरद पवार एकत्रित येऊ देत, असे साकडे आपण विठ्ठल चरणी घातले आहे. श्री विठ्ठल माझे गार्हाने नक्कीच ऐकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनानंतर व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी नववर्षानिमित्त बुधवारी (दि. 1) सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विठ्ठलाच्या दानपेटीत दानही टाकले. श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधाला.आशाताई पवार म्हणाल्या, मी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन साकडे घातले आहे की, माझ्या अजितला आणि सर्वांनाच चांगले, सुखी ठेव. त्यांच्या मागे असलेली संकटे दूर कर. अजित पवार आणि शरद पवार यांना एकत्रित येवू दे, असे पांडूरंग चरणी साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. अजित पवार भाजपबरोबर महायुतीत सामील झाले आहेत. सध्या ते उपमुख्यमंत्री आहेत. तर महाविकास आघाडीत सामील असलेले शरद पवार हे सत्तेतून बाहेर पडले आहेत. लोकसभेला व विधानसभेला पवार कुटुंबात एकमेकाविरोधात लढत झाली.