

रवी शिरढोणे
अकलूज : उंच माझा झोका गं, फू बाई फुगडी, पिंगा गं पोरी पिंगा, घागर घुमू दे, नाच गं घूमा, वारुळाला जाऊया अशा गीतांवर हजारों महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन पारंपरिक खेळातून नागपंचमी सण सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. महिलांनी पारंपरिक खेळातून संस्कृती जोपासली आहे.
महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष व सोहळ्याचे आयोजक जयसिंह मोहिते- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी पारंपरिक खेळ व संस्कृती जोपासणारा भव्य नागपंचमी सण सोहळा दि. १६ व दि. १७ ऑगस्ट रोजी शिवपार्वती मंदिर येथे सायं. ४ ते ८ यावेळेत आयोजित केला होता. यावेळी सुलक्षणादेवी मोहिते-पाटील, आयोजिका स्वरुपाराणी मोहिते -पाटील, सुमित्रादेवी खानविलकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील, कृष्णप्रिया मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.
प्रारंभी सहकार महर्षी कारखाना कार्यालयापासून हजारो महिलांनी चालत शिवपार्वती मंदिरात प्रवेश केला. मंदिर परिसरात असणाऱ्या शिवपार्वतीचे व नागोबाचे पूजन स्वरुपाराणी मोहिते-पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, कृष्णप्रिया मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर महिलांनी पारंपरिक खेळास सुरुवात केली. नागपंचमीचा झोका, फेर, फुगडी, पिंगा, काटवटकणा असे विविध पारंपरिक खेळाने त्यांच्या आनंदाला उधाण आले होते. लहान मुली ते वयोवृद्ध महिला सर्वजणच यात तल्लीन झाले होते. याकरिता मंदिर परिसरात २८ हजार स्क्वे. फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. तर विविध खाऊचे स्टॉल्सही उपलब्ध करण्यात होते.