

अकलूज : अकलूज येथील महावीर पथावरच्या सुहास गांधी यांच्या रूपाली मशिनरी कंपनी व रूपाली पाईप्स या दुकानास गुरुवारी (दि. 5) पहाटे शॉर्ट सर्किटने आग लागली. यात दुकानातील शेती साहित्य खाक झाल्याने सुमारे 80 लाख 90 हजारांचे नुकसान झाले. तर या दुकाना शेजारच्या आयडीएफसी फर्स्ट बॅंकेचे फर्निचर, चारचाकी, दुचाकी व रिक्षाही जळाली. याबाबतची खबर सोहन सुहास गांधी यांनी अकलूज पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने दुकानदार सोहन गांधी यांनी पाहिले असता त्यांच्या रूपाली मशिनरी दुकानाला आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी कुटुंबासह खाली येण्याचा प्रयत्न केला. पण, आग मोठी असल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे घराच्या खिडकीचे गज वाकवून आई, वडील, पत्नी, दोन मुलांसह ते बाहेर आले. या आगीत दुकानातील शेतीच्या इलेक्ट्रिक मोटरी (पंप) 22 नग, सबमर्सिपल केबल चार रोल, पिठाची चक्की व मिरची कांडप मशीन 20 नग, पीव्हीसी पाईप व फिटींग साहित्य, इलेक्ट्रिक मोटर साहित्य, शेती खते, संसारोपयोगी वस्तू व फर्निचर, होंडा सिटी कार व दोन दुचाकी असे साहित्य खाक झाले. घटना समजताच अग्निशामन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज स्वतः गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आगीत सुमारे 80 लाख 90 हजार रु.चे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजही त्यांनी व्यक्त केला. आगीत शेजारच्या आयडीएफसी फर्स्ट बॅंकेचे शटर, फर्निचर, एसी, सीसीटिव्ही सिस्टिम तसेच धन्यकुमार उपाध्ये यांची बुलेट दुचाकी, रिक्षा जळाली. अकलूज पोलीस ठाण्यात अकस्मात जळीत नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल रणवरे हे करत आहेत.