

अकलूज : अकलूज येथे उषा साठे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शहरातील दवाखाने व मेडिकल दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश सर्व व्यावसायिकांनी बंद पाळला.
चौंडेश्वरवाडी येथील शेतमजूर महिला उषा विजय साठे यांच्या हत्तेच्या निषेधार्थ बुधवारी, दि. १५ रोजी योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने पुकारण्यात आलेल्या अकलूज बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. गत ७ जुलै रोजी शेतमालक सचिन देशमुख यांनी उषा साठे यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केल्याचा निषेध करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि इतर संशयितांना सह आरोपी करण्यात यावे. या मागणीसाठी योद्धा प्रतिष्ठानने १५ जुलै रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अकलूज बंदचे आवाहन केले होते. तर दुपारी सकल बहुजन समाजाच्या वतीने प्रांत कार्यालय येथे भव्य मोर्चा काढून शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.