

अक्कलकोट : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सुचनेनुसार नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकाराने अक्कलकोट शहरात दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे पाणीटंचाईच्या काळात शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दररोज सुमारे १२ ते १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, प्रत्येक टँकरची क्षमता सुमारे सहा हजार लिटर आहे. त्यानुसार शहरवासीयांना दररोज अंदाजे ७० ते ८० हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, अक्कलकोट शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत व विनाअडथळा करण्यासाठी कुरनूर धरणातील जलउपसा यंत्रणेसाठी वाढीव क्षमतेची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच जलशुद्धीकरण केंद्रातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून वाढीव यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
सध्या सुरू असलेल्या या कामांमुळे नियमित पाणीपुरवठ्यात काही अडथळे निर्माण होऊन विलंब होत आहे. या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती पूर्ण होऊन शहरातील पुरवठा पूर्ववत होईपर्यंत ही व्यवस्था सुरू ठेवण्यात येणार आहे.
टँकरच्या पाण्यामूळे पाणी टंचाईवर मात
अक्कलकोट शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी संवेदनशीलता जपत नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नांतून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.