

सोलापूर : प्रभाग 14 च्या प्रारूप मतदार यादीत अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशांची नावे आली आहेत. ही नावे घुसडण्याचा प्रकार विधानसभा निवडणुकीपूर्वी घडला होता. आता ही नावे वगळावी, असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी एमआयएमचे माजी गटनेता रियाज खरादी यांनी महापालिका निवडणूक कार्यालयाकडे केली आहे.
प्रारूप मतदार यादीवर हरकती करण्यासाठी निवडणूक कार्यालयात रोज गर्दी होत आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीपूर्वी अक्कलकोट ग्रामीण भाग, शहर लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अनेक महिलांनी महा ई-सेवा केंद्राकडे आपले आधार कार्ड, पॅनकार्ड, फोटो दिले होते. या कागदपत्रांचा आधार घेऊन बोगस नोंदणी झाली आहे. उत्तरमधील जुना विडी घरकूल परिसर, जोडभावी पेठ, मंगळवार बाजार या भागातील मतदारांची नावे शहर मध्य मतदारसंघात नोंदविण्यात आली, असा खरादीचा आरोप आहे. निवडणूक कार्यालयाने सुधारित मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे.