

अक्कलकोट : येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृहात नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेत शहराच्या पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाच्या विविध कामांनाही गती देण्याचे निश्चित करण्यात आले. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सदरील सभेत शहराच्या विकासाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि जनहिताचे महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.
या सभेत मागील सभांचे इतिवृत्त कायम करण्यात आले. शहराच्या प्रलंबित विकासकामांना रीतसर मंजुरी देण्यात आली. दक्षिण महाद्वार समोरील दक्षिण बाजूस देवस्थानच्या नियोजित स्वागत कमान प्रवेशद्वारास तसेच मुरलीधर मंदिर समोरील दर्शन मंडप स्वागत कमान प्रवेशद्वारास ‘कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली. खासबाग येथील चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक’ असे नामकरण करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अक्कलकोट शहराचे धार्मिक महत्त्व जपण्यासाठी शहरातील मांसविक्री प्रत्येक गुरुवारी बंद ठेवण्याचा झालेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोट शहराला एक आदर्श आणि विकसित शहर बनवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
या सभेस मुख्याधिकारी रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड, पक्षनेते यशवंत घोंगडे, बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर, पाणीपुरवठा सभापती देविदास कवटगी, स्वच्छता व आरोग्य सभापती अविनाश मडिखांबे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली शिंदे, शिक्षण सभापती नगरसेवक, नगरसेविका, सर्व विभागीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.