

अक्कलकोट : अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषात लाखो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात प्रकट दिन साजरा करण्यात आला. श्री वटवृक्ष मंदिरासह बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठ, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्री गुरु मंदिर, श्री राजेराय मठ, शिवपुरी यज्ञनगरी, श्री स्वामी समर्थ विश्रांती धाम बागेहळ्ळी, श्री स्वामी समर्थ सेवा आश्रम ट्रस्ट या ठिकाणीही धार्मिक कार्यक्रम झाले.
प्रकटदिनी श्री स्वामींच्या दर्शनाकरिता पहाटे दोन वाजल्यांपासूनच दर्शनाकरिता मोठी रांग लागली होती. दरम्यान, पहाटे चार वाजता श्री स्वामींची पालखी प्रदक्षिणा शहरातून मार्गक्रमण करीत मंदिरात विसावली. पहाटे पाच वाजता काकड आरतीनंतर दर्शनासाठी मंदिर खुले केले. भाविकांनी दर्शनानंतर विविध धार्मिक वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती.
ब्रम्हांडाचे नायक म्हणून स्वामींकडे व स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या या वटवृक्ष मंदिराकडे पाहण्याचा भाविकांचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे हजारो स्वामी भक्तांनी भर उन्हातही स्वामींच्या दर्शनाकरिता गर्दी केल्याने ब्रह्मांडनायकाच्या दर्शन भेटीची ओढ काय असते, याची प्रचिती आज श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी भाविकांनी अनुभवली. भाविकांना शिस्तबद्ध स्वामींचे दर्शन व्हावे याकरिता पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताकरिता आलेले पोलीस कर्मचारी व समितीचे सर्व सेवेकर्यांनी परिश्रम घेतले. प्रकट दिनानिमित्त गाभार्यास आकर्षक फुलांची सजावट केली होती. ही सर्व सजावट स्वामी भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. दिवसभरात हजारो स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले.
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली होती. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली, जम्मू- काश्मीर, राजस्थान, उत्तर प्रदेश यासह देश-विदेशातील स्वामी भक्तांनी तीर्थक्षेत्र श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.