

अक्कलकोट : शहरातील मेन रोड येथील समर्थ चौकातील श्रीनिवास सिंदगीकर यांच्या जुन्या वाड्यात मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने मोठे नुकसान झाले असले तरी कुठलीही जीवित हानी झालेली नाही. आगीचे कारण समजू शकले नाही.
समर्थ चौक येथील श्रीनिवास सिंदगीकर यांचे सुमारे पन्नासाठ वर्षाहून अधिक जुना वाडा असून या ठिकाणी ते राहण्यास होते. मध्यंतरी सर्व वाड्याची पडझड झाल्याने ते त्यांच्या दुसऱ्या ठिकाणच्या जागेत राहण्यास गेले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास रात्र अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान धूर येत असल्याचे लगतचे रहिवासी शाहरुख शिकलगार यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ गल्लीतील सर्वांना जागे करून सदरील घटना सांगितली. लगेच गल्लीतील नागरिकांनी एकत्र येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
सदरील घटनेबाबत नगरसेवक महेश हिंडोळे, देविदास कवटगे, अविनाश मडीखांबे, सद्दाम शेरीकर, नन्नू कोरबू यांनी तात्काळ नगर परिषदेच्या अग्निशमन गाडी बोलावून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. दोन तासात 4 बंब पाणी मारून सकाळी 6 वाजता आग आटोक्यात आणली. यावेळी गल्लीतील नागरिक छोटू गुमटे यांनी स्वतः च्या बोअरचे पाणी सतत फवारलेे.तहसील प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.