टेंभुर्णी : खते व शेतीविषयक औषधे निर्माण करणाऱ्या कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून, ती स्विकारताना पुणे येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यासह एकाला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे. ही कारवाई रविवारी (दि.२०) करण्यात आली. दत्ता नारायण शेटे (वय. ४२ तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण, नेमणूक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय पुणे) आणि प्रमोद वाल्मिक सुरवसे (वय.३९ रा.हरीहर महाराज मठाजवळ पंढरपूर) अशी संशयितांची नावे आहेत.
पुणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील दत्ता शेटे यांनी जळोली ता.पंढरपूर येथील तक्रारदार यांच्या खते व शेती औषधे कंपनीत धाड टाकून तेथील सँपल घेतले होते. यानंतर कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ती रक्कम स्विकारुन गाडीमध्ये ठेवली होती. यावेळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये पन्नास हजार रूपया व्यक्तिरिक्त इतर रक्कम मिळून आली. ती एकूण रक्कम ६ लाख १४ हजार रुपये ही जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पुणे येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच लाचलुचपत विभागाचे पोनि उमाकांत महाडिक, पोलीस हवालदार अतुल घाडगे, पोलिस हवालदार सलिम मुल्ला, पोलिस कॉन्स्टेबल स्वामीराव जाधव, चालक राहुल गायकवाड, सर्व नेमणूक एसीबी, सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.