

सोलापूर : राज्यातील शेतकर्यांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याबरोबरच उत्पादीत होणार्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचे ज्ञान शेतकर्यांना उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकर्यांसाठी परदेशी अभ्यास दौर्यावर नेणार आहे.
शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकर्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यातील शेतकर्यांचे चालू सन 2025-26 या वर्षात राज्यातील शेतकर्यांना देशाबाहेरील अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत युरोप, नेदरलँड, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झलँड, इस्राईल, जपान, व्हिएतनाम, मलेशिया फिलीपाईन्स, चीन, दक्षिण कोरीया आदी देशांची निवड करण्यात आली आहे. शेतकरी अभ्यास दौर्यासाठी शेतकर्यांना दि. 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
शेतकरी शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त असणे बंधनकारक आहे. यासाठी शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, वैधता पत्र जोडावे लागणार आहे. तसेच शेतकरी शासकीय, निमशासकीय, सहकारी, खासगी संस्थेत नोकरीस नसावा. तसेच वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर, वकील, सीए, अभियंता, कंत्राटदार आदी शेतकरी अपात्र राहणार आहे. शेतकर्याची अभ्यास दौर्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकर्याने परदेश दौर्यासाठी शारीरिकद़ृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. अहवालानुसार शेतकर्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सलग 7-10 दिवस कालावधीचा परदेश दौरा करण्यास शेतकरी शारीरिकद़ृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा, स्वतःच्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा आणि फार्मर आयडी आवश्यक, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावे, शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शिधापत्रिकेची झेरॉक्स आणि आधार प्रमाणपत्राची प्रत, तसेच 25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक.