करमाळा : 244 करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या मतदान मोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली असून शनिवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून मतमोजणीच्या धामधमीला सुरुवात होणार आहे. असे असले तरी प्रत्यक्षात सकाळी साडेसात वाजता मतमोजणी सुरू होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली.
करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये 347 मतदान केंद्रांमधून मतदान घेण्यात आले आहे. या 347 ईव्हीएम मशिनची मतमोजणी 14 टेबलवर होणार असून 25 राऊंडमध्ये मोजणी होणार आहे. 14 टेबलवर मतमोजणीसाठी 56 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. टपाल मतमोजणी 12 टेबल आठ राऊंडमध्ये होणार आहे. या मतमोजणीसाठी बारा टेबल लावण्यात आलेे आहेत. या 12 टेबलवरील मतमोजणीसाठी 60 कर्मचारी तैनात आहेत. एकूण 26 टेबलवर मतमोजणी होणार असून 33 फेर्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या नेतृत्वाखाली एकूण 116 कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ही सर्व मतमोजणी चार तासांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टपाली मतदान हे सुमारे दोन हजार मतदारांचे असून ते एक तासात संपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.पोलिस प्रशासनाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद घुगे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.