

माढा : शिवसेना शिंदे गटाचे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याशी संबंधित भैरवनाथ शुगर वर्क्स लि., आलेगाव (ता. माढा) या कारखान्याने 2 कोटी 95 लाख रुपयांची एफआरपी थकविल्याप्रकरणी ‘आरआरसी’ (रेव्हेन्यु रिकव्हरी सर्टिफिकेट) कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिल्याने सावंतांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
याबाबत साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांनी दिलेल्या आदेशानुसार ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 चे कलम 3 (8) अन्वये भैरवनाथ शुगर वर्क्स लि. आलेगाव या साखर कारखान्याकडील सन 2024-25 च्या हंगामामधील गाळप ऊसाचे थकित एफ.आर.पी. रक्कम दोन कोटी पंचाण्णव लाख नऊ हजार तसेच कलम 3 (3 ए) नुसार सदर रकमेवर 15टक्के दराने देय होणारे व्याज या रकमा या कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादीत केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस आदी उत्पादनाची विक्री करुन त्यामधुन सदर रक्कम वसूल करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
साखरसाठा बँकेकडे तारण असल्यास तारण नसलेली कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करून सदर मालमत्तेवर दस्तऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद घ्यावी, सदर मालमत्तेची जप्ती करून त्याची विहित पद्धतीने विक्री करून या रकमेतून ऊस (नियंत्रण) आदेश, 1966 मधील तरतुदीनुसार देयबाकी रकमेची खात्री करून संबंधितांना विलंबित कालावधीसाठी 15 टक्के व्याजासह अदा करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकारी, सोलापूर यांना ऊस (नियंत्रण) आदेश 1966 चे कलम 3 (9) नुसार कारवाई करणेस प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.
माजी मंत्री तानाजीराव सावंत हे भैरवनाथ शुगरचे सर्वेसर्वा मानले जातात. या कारवाईमुळे सावंताना धक्का बसणार आहे. हा धक्का कुटुंबकलहामुळे की अन्य काही गोष्टींमुळे याबाबत आता जनतेत तर्कवितर्क लढवले जात आहेत.