

सोलापूर : आ. सचिन कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्तांना देण्यात आले. यावेळी तीनशे ते साडेतीनशे कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कठोर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी आ. कल्याणशेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालयावर मोठी गर्दी केली होती. भाजप अक्कलकोट उत्तर मंडलचे अध्यक्ष अमोल हिप्परगे, मध्य मंडलचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, नेताजी खंडागळे, पृथ्वीराज माने, नगरसेवक महेश इंगळे, सद्दाम शेरीकर, सुनंदा स्वामी, अंजली शिरसट, महादेवी वाघमोडे, अल्फीया कोरबू, कस्तुराबाई चौगुले, विकास बुळ्ळा, मळसिद्ध मुगळे आदी उपस्थित होते. दरम्यान, आ. कल्याणशेट्टी यांचे कुटुंबीय ७ ऑगस्टला सोलापूर शहरात आले असता महावीर चौक परिसरात दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी त्यांच्या वाहनचालकासमोर आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.