

सोलापूर : आपले सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्रातून विविध दाखले उतारे व अन्य प्रमाणपत्रे ऑनलाईन पध्दतीने दिले जातात. त्यासाठी अधिकचे पैसे मागितल्यास थेट कारवाई होणार असून, तक्रार नोंदविण्यासाठी प्रांताधिकारी, तहसिल कार्यालयात क्यु आर कोड उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या क्युआर कोडवर 8 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
क्यु आर कोड कोणत्याही मोबाईल अॅपवरून स्कॅन करून नागरिकांना सुलभरित्या तक्रार नोंदविण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे. 13 फेब्रुवारीपर्यंत एकुण 8 तक्रारी क्यु आर कोडद्वारे नोंदविल्या गेल्या आहेत. या तक्रारीमधील 1 तक्रारीबाबत अर्जदार यांना कळविण्यात आले आहे. उर्वरीत प्रकरणांबाबत चौकशी अहवाल प्राप्त करून तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्ती (एजंट) यांच्याकडून पैशाची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तात्काळ तक्रार करता यावी, यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात दर्शनी भागात क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे, संबंधित नागरिकांनी हा किंवा कोड स्कॅन करून यावर तक्रार नोंदवण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, यावरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, माढा, या तहसिल कार्यालयांकडे प्रत्येकी एक तक्रार अर्ज प्राप्त झाले असून, तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूरकडे एक अर्ज प्राप्त झाला. तक्रार अर्ज हा आपले सरकार सेवा केंद्राशी संबंधित नसल्याने तक्रार अर्ज तहसिलदार दक्षिण सोलापूरकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले आहे. तहसिल कार्यालय बार्शीकडे 2 अर्ज असे आठ अर्ज प्राप्त झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.