

सोलापूर : दैनिक ‘पुढारी’च्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त आज बुधवारी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हेरिटेज मंगल कार्यालयाच्या प्रशस्त लॉनवर सायंकाळी सहापासून हा कार्यक्रम सुरू होईल. दै. ‘पुढारी’ने रोखठोक पत्रकारितेद्वारे विविध प्रश्नांवर भूमिका घेत व्यवस्था बदलायला भाग पाडली आहे. निर्भीड, परखड, वस्तुनिष्ठ पत्रकारिता करत अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ‘पुढारी’नेहमीच करत आहे. अशा या ‘पुढारी’चा बुधवारी वर्धापन दिन साजरा होत आहे.
सोलापूर शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या समांतर जलवाहिनीचा प्रश्न असो की बहुचर्चित विमानसेवा, सिटी बस. तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर परिसरातील विविध प्रश्नांसह पंढरपूरचा कॅरिडॉरचा विषय असो, कृषी उत्पादनासह उसाच्या एफआरपीचा विषय अशा असंख्य प्रश्नांवर रोखठोक भूमिका घेत दैनिक ‘पुढारी’ सर्वसामान्यांचा आवाज बनला. यामुळे सोलापूरकर वाचकांनी ‘पुढारी’वर नेहमीच भरभरून प्रेम केले.
‘पुढारी’चा वर्धापन दिन आणि नव्याकोर्या विषयाला वाहिलेल्या पुरवण्या हे जणू समीकरणच झाले आहे. यंदाही वर्धापनदिनानिमित्त ‘ए. आय. महाक्रांती’ या ए. आय.विषयी सर्वकाही अशा विशेष पुरवण्या ‘पुढारी’ एक तारखेपासून प्रसिद्ध करत आहे. सोलापूर परिसरातील या विषयांतील तज्ज्ञांच्या अतिशय अभ्यासपूर्ण लेखणीतून साकारलेल्या या संग्राह्य पुरवण्या वाचकांना नक्कीच आवडतील अशाच आहेत.
स्थळ : हेरिटेज मंगल कार्यालयाचे प्रशस्त लॉन
वेळ : आजच सायं. 6 वाजल्यापासून
विशेष : गप्पांची मैफल अन् स्नेहीजनांशी संवाद