

सोलापूर : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून (दि.21) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी मराठीच्या पेपरला 968 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. 58 हजार 547 विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर सोडविला. जिल्ह्यात पहिल्याच दिवशी कुर्डूवाडीत एकावर कॉपी केल्याप्रकरणी कारवाई केली.
प्रत्येक केंद्रावर भरारी पथके, बैठी पथके, पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर परीक्षा केंद्रावर आहे. प्रत्येक केंद्रावर केंद्र संचालक, पर्यवेक्षकांसह कर्मचारी नियुक्त आहेत. पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला कॉपी करणार्या एका परीक्षार्थीवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परीक्षेत कॉपी करणार्या परीक्षार्थींचे धाबे दणाणले आहे.
कुर्डूवाडी (ता. माढा) येथील नूतन विद्यालय केंद्रावर मराठी पेपरला एका परीक्षार्थीवर कॉपी केल्याची कारवाई केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरात व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर भरारी पथकाकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. पेपर सुरू होण्यापूर्वी पेपर सुरू झाल्यानंतर द्विस्तरीय समितीकडून विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत होती. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठक पथक तैनात करण्यात आले आहे.