

सोलापूर : जिल्ह्यातील महापूर व अतिवृष्टीचा फटका ज्या शेतकऱ्यांना बसला आहे, त्यांना यंदा अपेक्षित दिवाळीच साजरा करता आला नाही. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्यासाठीच शासनाकडून 927 कोटींच्या निधीचे वाटप केले जात असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणीही नेते, कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेले नाहीत. कोणाचा याविषयी गैरसमज झाला असेल तर तो दूर करू. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचेही मंत्री भरणे म्हणाले. भरणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून निवड केल्यानंतर ते प्रथमच पक्षनेत्यांची आढावा बैठक घेण्यासाठी सोलापुरात आले.
भरणे म्हणाले, पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकटीला महत्त्व देत आहेत. जिल्ह्यातील एकही महत्त्वाचा कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नाही. पक्षाविषयी ज्यांच्या मनात गैरसमज झाला आहे तो दूर केला जाईल. आजतरी महायुतीच्या वतीने निवडणुकीची तयारी सुरू आहे. आजच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांचे मतही जाणून घेतले आहे. ज्यांना निवडणुकीत संधी दिली जाणार नाही त्यांना महामंडळावर संधी दिली जाईल. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष संतोष पवार व माजी नगरसेवक आनंद चंदनशिवेसह अन्य उपस्थित होते.