

सोलापूर : जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या एक लाख 81 हजार 676 विद्यार्थ्यांना दुसर्या गणवेशाचे वाटप झाले. नऊ हजार 747 विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात गणवेशाचे वाटप होणार असल्याने अद्यापही नऊ हजार 747 विद्यार्थी दुसर्या गणवेशापासून वंचित राहिले आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर शासनाकडून दोन गणवेश मोफत दिले जातात. यंदाच्या वर्षी मात्र पहिला गणवेश दिल्यानंतर दुसर्या गणवेशाचे वाटप शैक्षणिक वर्ष संपतेवेळी होत आहे. आता शंभर टक्के विद्यार्थ्यांचे गणवेश शिवून तयार झाले आहेत. त्यातील 95 टक्के गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. तर अद्यापही पाच टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.
चालू शैक्षणिक वर्षात गणवेश देण्याचे अधिकार शालेय व्यवस्थापन समितीकडे न देता महिला आर्थिक विकास महामंडळाकडून शिवून घेऊन गणवेशाचे वाटप करण्यात येत असल्याने दुसरा गणवेश देण्यास विलंब लागत आहे. जिल्ह्यातील एक लाख 92 हजार 128 विद्यार्थी गणवेशासाठी पात्र आहेत. त्यातील सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या गणवेशाचे वाटप केले आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे दुसरा गणवेश शिवून तयार झाले आहेत. मात्र, त्यातील 95 टक्के गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात गणवेशाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली.
आकडे बोलतात एकूण विद्यार्थी - एक लाख 92 हजार 128 गणवेश शिवून तयार - एक लाख 92 हजार 128 गणवेश वाटप - एक लाख 81 हजार 676 गणवेश वाटणे बाकी - नऊ हजार 747 गणवेश वाटप टक्केवारी - 95 टक्के