

पंढरपूर : गुरुपौर्णिमा हा गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा दिवस आहे. याचदिवशी पंढरपुरात दोन शिष्यांनी गुरूने दिलेला आदेश पाळत विठ्ठल चरणी 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला. त्याची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये आहे. हा चांदीने मढवलेला दरवाजा विठ्ठलाच्या गाभार्यात जाणार्या चौखांबी येथे बसवण्यात आला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू-शिष्य परंपरेचे एक अनोखे उदाहरण भाविकांना पाहायला मिळाले.
अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड या भाविकांनी हे महाद्वार विठ्ठलाला अर्पण केले आहे. अतुल पारख व गणेश आव्हाड हे अहिल्यानगरचे रहिवासी आहेत. आदिनाथ महाराज हे त्यांचे गुरू आहेत. आदिनाथ महाराजांनी या दोघांना गुरुपौर्णिमेला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी चांदीचा दरवाजा अर्पण करा, असा आदेश दिला होता. महाराजांनी दिलेला हा आदेश दोन्ही शिष्यांनी पाळला. त्यांनी विठ्ठलाच्या चरणी 87 किलो वजनाचा चांदीचा दरवाजा अर्पण केला. याची किंमत तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे राजस्थानातील उदयपूर येथून हा चांदीचा दरवाजा घडवून आणला आहे. या चांदीच्या दरवाजामुळे विठ्ठलाच्या ऐश्वर्यात मोठी भर पडली आहे. या शिष्यांची चर्चा यामुळे पंढरपुरात रंगली आहे.