सोलापूर : मास्क न वापरल्याने ठोठावला दहा हजारांचा दंड | पुढारी

सोलापूर : मास्क न वापरल्याने ठोठावला दहा हजारांचा दंड

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर येथील महानगरपालिकेने शहरात कडक निर्बंध लागू केले असून, त्याची अंमलबजावणी केली जात आहे. परिणामी, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना मास्क न वापरल्याने एका नागरिकास दहा हजारांचा दंड महापालिका प्रशासनाने ठोठावला आहे.

कोविड आणि ओमायक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर नियम- अटींचे काटेकोर पालन करा, अन्यथा व्यक्तींना पाचशे, बस मालकास दहा हजार आणि आस्थापनास दहा हजार ते पन्नास हजार रूपये प्रत्येक वेळेस दंड आकारण्यात येईल, असे आदेश प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी दोन दिवसांपूर्वी जारी केले होते.  नियम व अटी न पाळणार्‍यांविरोधात प्रत्येक वेळेस दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.

या नियम व अटींचे उल्‍लंघन करणार्‍यांना आस्थापना, व्यक्ती, संस्थांवर कडक कारवाई करण्यात येत असून, यासाठी भरारी पथके नेमली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निराळे वस्ती येथील नागरिकास विना मास्क फिरल्याने महापालिकेचे दुय्यम निरीक्षकांनी दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला.

कोविड-१९ विषाणू आणि ओमायक्रॉनच्या नियंत्रणासाठी शहरात लसीकरणाची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येत आहे. दुसरीकडे शहरातील पेट्रोल पंप, रिक्षा, प्रवाशी वाहतूक, मोठे मॉल्स, बँका, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिडी कारखाने व सर्व आस्थापना व इतर गर्दीच्या ठिकाणी लसीकरणाचे २ मात्रा घेतलेल्यांनाच प्रवेश दिला जात आहे. यासाठी जनजागृती, अंमलबजावणी व कारवाईचे अधिकार पोलीस व महानगरपालिका प्रशासन यांना दिले आहेत.

तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रानुसार, अधिकारी, डॉक्टर, पोलिस निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक यांचे पथक तयार करण्यात आले आहे. पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय अधिकारी हे काम पाहत आहेत. विभागीय अधिकारी यांनी पथकातील सर्व सदस्यांचा समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांची दैनंदिन जास्तीत- जास्त तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

एखाद्या आस्थापनेत ग्राहक, अभ्यागत यांचेकडून कोविड प्रतिबंधक वर्तनाचे पालन होणार नाही, त्या ग्राहकांना व अभ्यागतांनाही दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक, आस्थापना, संस्था आदींनी नियम, अटींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

दंडाच्या भीतीने नियम-अटींचे पालन

सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना मास्क न वापरल्याने महापालिका प्रशासनाने एका व्यक्तीस दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दंडाची रक्कम ऐकून भीती निर्माण झाली आहे. या दंडाच्या रक्कमेमुळे इतर नागरिक मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आदी नियम-अटींचे पालन करत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button