

सांगोला : भीमनगर, सांगोला येथे गायरान जमिनीवर देशी खिलार गायी, खोंडे, कालवडी व जर्सी कालवडी बांधून ठेवली होती. त्यांची बाजारभावानुसार किंमत 7 लाख 63 हजार रुपये आहे. अशा 85 जनावरांना सांगोला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली आहे. तर अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे कत्तलखान्याकडे घेऊन जाणाऱ्या जनावरांच्या व्यापाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 16 मार्च रोजी भीमनगर, सांगोला येथे गायरान जमिनीवर देशी खिलार गायी, खोंडे, कालवडी व जर्सी कालवडी बांधून ठेवली असल्याची माहिती रात्री पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथक तयार करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पो.नि. घुगे यांनी भीमनगर येथील गायरान जमिनी असलेल्या ठिकाणी रात्री 2.30 वा. जाऊन खात्री केली. तेव्हा तेथे खिलार गाई, गीर गाई, जर्शी कालवडी आदी एकूण 85 जनावरांना चारा पाण्याची कोणतीही सोय न करता दाटीवाटीने चिलारीच्या झुडुपामध्ये अज्ञात इसमांनी बांधून ठेवलेल्याचे आढळले. जनावरांच्या मालकाबाबत आजूबाजूला चौकशी केली. परंतु, काही माहिती मिळून आली नाही. त्यामुळे ही जनावरे सपोनि भारत वाघे यांनी पंचनामा करुन ताब्यात घेतली. याबाबत सांगोला पोलिस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशान्वये सपोनि वाघे, पोसई पुजारी, पोसई पाटील, नपोसई उबाळे, मपोसई चव्हाण, ग्रे. पोसई बगाडे, कदम, पोहेकॉ कोष्टी, वाघमोडे, क्षीरसागर, जाधव, लेंगरे, वाकीटोळ, पकाले यांनी केली आहे.