सोलापूर; महेश पांढरे : शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता यावी तसेच कामात समन्वय यावा यासाठी अधिकार्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था असावी यासाठी निर्माण करण्यात आलेल्या सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाचा ताबा सध्या शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांनी घेतला आहे.
यातील अनेक अधिकारी याठिकाणी गेल्या दोन अडीच वर्षांपासून तळ ठोकून आहेत. काही चाणाक्षमंडळी आपल्यावर काय बालंट येऊ नये यासाठी दुसर्यांच्या नावे रूम बुक करुन राहत आहेत. शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना राहणीमान भत्ता आणि घरभाडे मिळत असतानाही या मंडळींनी शासकीय विश्रामगृहाचा ताबा घेऊन शासनाच्या विश्रामगृहाचे भाडे चुकवायचा धंदा सुरु केला आहे.
शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय नेतेमंडळी, विविध खात्यांचे मंत्री, सचिव, उपसचिव तसेच विविध शासकीय समित्यांचे सदस्य, अध्यक्ष हे विविध बैठका आणि सभांसाठी शहराच्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे त्यांच्या राहण्याची आणि थांबण्याची व्यवस्था व्हावी तसेच शासकीय कामकाज सुरळीत व्हावे यासाठी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकव्यवस्था आणि कॉन्फरन्स हॉल करण्यात आले आहेत. याठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत तसेच काही कारणांस्तव चार ते पाच दिवसांसाठी आश्रय घेणे अपेक्षित असताना सध्या जवळपास आठ ते दहा अधिकारी आणि कर्मचार्यांनी गेल्या दोन वर्षांपासून या शासकीय विश्रामगृहात तळ ठोकला आहे.
यामध्ये काही पोलिस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी आहेत. काहीठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आहेत. दोन वर्षांपासून त्यांनी या शासकीय विश्रामगृहाचा ताबा घेतला आहे. याठिकाणी विश्रामगृहाच्यावतीने आकारण्यात येणारी नाममात्र फी भरण्याचेही औदार्य या मंडळींकडे नाही. अगदी आपण शासनाचे जावईच आहोत या अविर्भावात ही मंडळी याठिकाणी तळ ठोकून आहेत. यामध्ये महसूल विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी, अँटिकरप्शनचा 1, पोलिस खात्यातील तीन ते चार कर्मचारी याठिकाणी राहत आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ बाहेर काढावे; अन्यथा त्यांच्याकडून राहणीमान भाडे वसूल करावे, अशी मागणी लाऊन धरण्यात आली
आहे.
या मंडळींना शासन पगारातच राहणीमान भत्ता आणि घरभाड्यापोटी पैसे देत असते. त्यामुळे या लोकांनी भाड्याने घर घेऊन राहण्यास कसलीच हरकत नसताना सातत्याने फुकट खायची आणि राहायची सवय लागलेली ही मंडळी गेल्या दोन वर्षांपासून हे विश्रामगृह सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेकवेळा मुंबई तसेच मंत्रालयातून आलेल्या काही लोकांना याठिकाणी राहण्यासाठी आणि थांबण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये वादावादी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे विश्रामगृह प्रशासनही आता हतबल झाले असून, या मंडळींना आता बाहेर काढण्यासाठी वरिष्ठांनीच पावले उचलावीत, असा अंगुलीनिर्देश कर्मचार्यांनी केला आहे. (क्रमश:)
शासकीय विश्रामगृहातील व्हीआयपी रेस्टहाऊस असलेल्या 'प्राजक्त', 'गुलमोहर' आणि 'पुष्पराज' याठिकाणी अनेक अधिकार्यांनी गेल्या काही वर्षांपासून तळ ठोकला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळणार नाहीत एवढ्या सेवासुविधा याठिकाणी असल्याने या अधिकार्यांना या शासकीय विश्रामगृहाचा मोह सुटेनासा झाला आहे. त्यामुळे नियम व अटी धाब्यावर ठेऊन हे अधिकारी याठिकाणी तळ ठोकून आहेत.