अडीच महिन्यांनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

अडीच महिन्यांनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन व सुशोभीकरणाच्या कामाकरिता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद होते. श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभार्‍यातील काम पूर्ण झाल्याने तब्बल अडीच महिन्यांनंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला रविवारी सुरुवात करण्यात आली. पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने विठ्ठलाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी आस लावून बसलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. पदस्पर्श दर्शन रांग मंदिरापासून सारडा भवनच्या पुढे पत्राशेडच्या पुढे सरकली आहे. वीकेंड असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दर्शनासाठी आले आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन व सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. मंदिराला सातशे वर्षापुर्वीचे रुप मिळवून दिले जात आहे. पहिल्या टप्प्यातील या सुरु असलेल्या कामात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भग्रहातील कामे प्राधान्याने पुर्ण करता यावीत म्हणून 15 मार्चपासून श्री विठ्ठल व रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले आहे. तर केवळ सकाळी 6 ते 11 यावेळेत मुख दर्शन सुरु होते. मात्र, श्रींच्या गर्भग्रहातील कामे पुर्ण झाली आहेत. तब्बल अडिच महिन्यानंतर म्हणजेच 80 व्या दिवशी भाविकांना विठ्ठल व रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन सुरु करण्यात आले आहे.

दर्शनाकरीता आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश करताच सोळखांबी, चार खांबी तसेच गर्भग्रहातील, खांबावरील, दरवाजांवरील चांदी काढण्यात आल्याने मंदिराचे जुने रुप पाहता येत आहे. मंदिराच्या भिंती, खांब, दरवाजे यावर कोरण्यात आलेल्या नक्षी, देवदेवता, संदेश स्पष्ट दिसत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पिण्याचे शुध्द पाणी, दर्शन रांगेत सावली, चहा, पोलीस संरक्षण पुरवले जात आहे. त्यामुळे तासनतास भाविक दर्शन रांगेत उभे राहत असल्याचे चित्र आहेे. भाविकांनी तळघरात सापडलेल्या मुर्त्या, पादुका पाहता येत आहेत. रविवारी मंदिरात विठ्ठल गाभारा व रुक्मिणीच्या गाभार्‍यात, दर्शनी भागात आकर्षक फुलांची सुंदर सजावट करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर परिसर, भक्तीमार्ग, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, स्टेशन रोड फुलून गेला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news