पंढरपूर, पुढारी वृत्तसेवा : मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली केवळ नूतनीकरण होते आहे. त्यातून काहीच साध्य होणार नाही. त्यापेक्षा प्राचीन, पुरातन मंदिरांचे संगोपन आणि संवर्धन गरजेचे आहे, असे प्रतिपादन 'पुढारी'चे मुख्य संपादक, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी रविवारी येथे केले. नांदेडच्या गुरू ता गद्दी स्थळाच्या विकासाच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा तयार करावा. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा. मी त्याचा पाठपुरावा करेन. त्यातून पंढरपूरचा पूर्णपणे कायापालट करू, असा विश्वासही पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॉ. जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औसेकर महाराज होते. पंढरपूर हे महाराष्ट्राचे अधिष्ठान आहे. ज्ञानोबा-तुकोबारायांपासून अवघ्या संतांची मांदियाळी या तीर्थक्षेत्राला लाभली आहे. महाराष्ट्राची संस्कृती, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज व्यक्त करून पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणाले की, नांदेडला गुरू ता गद्दीच्या विकासासाठी 2 हजार कोटी रुपये दिले. त्यातून या शहराचा संपूर्ण कायापालट झाला. त्याच धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करावा. तो केंद्र सरकारकडे पाठवावा. आपण त्याचा पाठपुरावा करू. यावेळी पद्मश्री डॉ. जाधव यांनी दक्षिणेतील मंदिरांच्या जतन, संवर्धनाची उदाहरणे दिली.
डॉ. जाधव म्हणाले, पंढरपूरला यापूर्वी अनेकवेळा आलो आहे. आज श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामाची पाहणी केली. तसेच परवा सापडलेल्या तळघरातील मूर्तींचीही पाहणी केली. माझे कुलदैवत तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे. पुढे जाऊन अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे. मग परत कोल्हापूरला जायचे हा आमचा नेहमीचा प्रघात. पण आज पंढरपूरच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर खूप आनंद झाला, समाधान वाटले. कारण मंदिराचे सातशे वर्षांपूर्वीचे खरेखुरे रूप पाहायला मिळाले. इतकेच नव्हे तर श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्या ठिकाणी मस्तक टेकले, त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज यांनी ज्या ठिकाणी मस्तक टेकले, सर्व संतांनी ज्या ठिकाणी डोके टेकले, त्या पावलावरच मला आज डोके टेकायला मिळाले, अशा माझ्या भावना झाल्या.
डॉ. जाधव म्हणाले, बर्याचजणांचा असा समज असतो की, जीर्णोद्धार म्हणजे नूतनीकरण. पण नूतनीकरण म्हणजे जीर्णोद्धार नव्हे. प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन आणि संगोपन हे त्यातील महत्त्वाचे आहे. शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी मी कोल्हापूर येथे नसताना त्यांनी जोतिबा मंदिराविषयी मिटिंग घेतली. त्यानंतर त्यांनी मला सांगितले की, जोतिबा मंदिराचा विकास करायचा आहे. त्यासाठी जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेकांची म्हणजे लोकप्रतिनिधी, खासदारांची नावे पुढे आली. मात्र शरद पवार यांनी सांगितले की, येथे विकास करायचा आहे. पण शासन पैसे देणार नाही. ते पैसे तुम्हाला जनतेमधून जमा करायचे आहेत. त्यावेळेस प्रत्येकांनी आपापले नाव मागे घेतले. तत्कालीन खासदार बाळासाहेब माने यांनी उठून सांगितले की, आम्ही आमदार, खासदार येथे आहोत, पण पैसे उभे करण्याची आमची कोणाचीच ताकद नाही. हे काम करू शकणारी एकच व्यक्ती आहे ते म्हणजे 'पुढारी'चे संपादक जाधवसाहेब. त्यांना तुम्ही बोलवू शकता.
त्या मिटिंगला मला कलेक्टरांनी फोन केला. मी मिटिंगला गेलो. शरद पवार यांनी मला फोन केला. तुमच्यावर मी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत असल्याचे त्यांनी सांगितले. मी त्यांना सांगितले की, माझ्या व्यस्त कामातून मला या मंदिराचा जो काही बदल किंवा काही करणार आहात त्याला तेवढा वेळ देता येणार नाही. पण तुमची माझ्यावर जबाबदारी काय आहे ते सांगा. तर त्यांनी सांगितले की, या मंदिराला लागणारा सगळा जो निधी आहे तो तुम्हाला जमा करावयाचा आहे. मी म्हणालो ठीक आहे, आनंदाने मी ही जबाबदारी स्वीकारतो. मी निधी जमा केला. त्या मंदिराच्या दगडांवर सातत्याने ऑईल पेंट लावल्यामुळे त्याचा थर दोन इंचापर्यंतचा चढलेला होता.
त्यावेळी आम्ही मशिनरी मागविली. त्यातून सँड ब्लास्टिंग केले. दगडावरील रंग काढला. जोतिबाच्या मंदिर आवारामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांचेही ऑफिस होते. मी त्यांना बोलावून घेतले. त्यांना सांगितले की, माधवरावजी, तुम्हाला आम्ही ऑफिससाठी बाहेर जागा देतो. पण हा भाग आम्हाला द्या. त्यांनीही होकार दिला. नंतर तेथील दुकानदारांना विनंती करून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तेथे पायर्या नव्हत्या. नुसत्या दगड, फरशा होत्या. वाट पाच ते सहा फुटांचीच होती. त्यावेळी गौतम म्हणून असिस्टंट कलेक्टर होते. त्यांनी दुकानदारांना समजावून सांगण्यासाठी पोलीस घेऊन जाण्याचा प्लॅन केला. पण मी त्यांना म्हणालो की, अशाने काही होणार नाही. त्या दुकानदारांना प्रेमाने समजवावे लागेल. मी समजावून सांगितल्यानंतर सर्वांनी मान्य केले. त्यानंतर 20 फूट पायर्या केल्या.
आज मी मुद्दाम औसेकर महाराजांना सांगेन की, या आषाढी वारीला जे भक्त लोक येतील, भाविक येतील, वारकरी येतील त्यांना विठ्ठल मंदिराचे हे खरे, मूळ रूप बघून त्यांना नक्कीच खूप आनंद होईल. मंदिराचे हे प्राचीन रुपडं बघितले की, तेथेच त्यांना आपण श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचे सुख त्यांना मिळेल. इतके चांगले तुम्ही काम केलेले आहे, असेही डॉ. जाधव म्हणाले. पत्रकारांसह मंदिर समितीच्या अधिकारी पदाधिकार्यांच्या सत्काराविषयी डॉ. जाधव म्हणाले, खरेतर तुमच्या संगळ्याचा आज सत्कार माझ्या हस्ते झाला हे मी माझे भाग्य समजतो. कारण तुम्ही माऊंलीची सेवा करत आहात. संपादक या नात्याने म्हणजे माझी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 55 वर्षे झाली. मी ज्यावेळेस 75 वर्षाचा झालो त्यावेळेस माझे चेअरमनपद माझ्या चिरंजीवाच्याकडे दिले. आज मी 80 मध्ये आहे. सुशीलकुमार शिंदे आणि मी 1964 साली एलएलबीला लॉ कॉलेजला पुण्याला एकत्र शिकण्यास होतो. त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे हे पोलीस खात्यात गेले. पुण्यात जर्नालिझम, एलएलएम केल्यानंतर मी हायकोर्टला वकिली सुरू केली. त्यावेळेला रामराव आदिक होते. त्यानंतर लंडनला गेलो. पुढे मी ङ्गपुढारीफची सूत्रे 1969 साली संपादक म्हणून ताब्यात घेतली.
डॉ. जाधव म्हणाले, जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी आणि यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे या सगळ्या पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री या सर्वांचा मी आढावा घेतलेले माझे एक हजार पानांचे आत्मचरित्र झालेले आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळे संदर्भ मिळतील. म्हणजे अगदी 1965 चे युध्द असू दे, आणीबाणी असू दे ते संगळे त्यामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आत्मचरित्र केवळ मराठीतच नव्हे; तर ते हिंदी आणि इंग्लिश भाषांतरित व्हायला हवे, असा आग्रह धरला. त्यांनी ते मागवून घेतले. दिल्लीमध्ये ते हिंदी आणि इंग्रजी भाषांतर करायलाही दिले आहे. त्याची इच्छा आहे की, हे सर्वांकडे जावे.
पत्रकार या नात्याने मी कुठल्याही पक्षात कधीही गेलेलो नाही. ज्यावेळी मी भाऊसाहेब खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर त्यांचा खासबाग कुस्त्यांच्या मैदानात कोल्हापुरात सत्कार केला त्यावेळेस यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे होते. माझे भाषण ऐकल्यानंतर यशवंतराव चव्हाण आमच्या घरी जेवायला आले. ते आमच्या वडिलांना म्हणाले की, आम्ही यांना लोकसभेला उभा करतो. त्यावेळीस यशवंतराव चव्हाण यांना म्हणालो की, साहेब आभारी, परंतु मी तुमच्या पक्षात आलो, तर मी त्या पक्षाला बांधील होईल. मला कोणाची बांधीलकी नको आहे. मला जे आज स्वातंत्र्य आहे तेच ठेवायचे आहे. त्यामुळे मला कोणावरही टीका करता येते. मी कुठल्या पक्षात गेलो तर नि:ष्पक्षपणे टीका करू शकणार नाही. त्यांनी ते मान्य केले. त्यामुळे मी आज पत्रकार या नात्याने सडेतोड लिहू शकतो. मी तुम्हाला सांगतो, जेंव्हा मी स्वतः किंग होण्यापेक्षा किंगमेकरची भूमिका असणे, आपल्या हातात लगाम असणे केव्हाही चांगलेच. माझ्या मित्रांनो तो लगाम तुमच्या हातात आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा.
डॉ. जाधव म्हणाले, मी जगभर फिरतो तेव्हा जाणवते की, आपल्या दक्षिण भारतातील सर्व प्राचीन मंदिरे जशीच्या तशी ठेवलेली आहेत.उत्तरेकडे मात्र मंदिरांचे काय झालेले आहे ते आपण पाहातोच. दुर्देवाने 800 ते 1000 वर्षे मुगलांनी आक्रमण केल्यामुळे मंदिरांचा विद्ध्वंस केला. 150 वर्षे ब्रिटिशांनी राज्य करून या सुवर्णभूमीतून जेवढे लुटता येईल तेवढे लबडून, ओरबडून नेले. मी तुम्हाला सांगतो की, 1972 साली अलबर्ट म्युझियमला मी पत्र लिहिले आणि विचारले की, तुमच्याकडे शिवाजी महाराजांच्या काही वस्तू आहेत का? त्यांचे उत्तर आले की, शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार आणि अफजल खानाला मारलेली वाघ नखे आमच्याकडे आहेत. त्यांनी त्याचा फोटोही मला पाठविला. मी शासनाला ते पाठविले, पण तुम्हाला माहीत आहे की, शासनाच्यावतीने काही होत नाही. की आपण शिवाजी महाराज कि जय म्हणतो, जय भवानी, जय शिवाजी म्हणतो, किंवा शाहु, फुले, आंबेडकर म्हणतो या फक्त राजकीय घोषणा आहेत.
त्यात मनापासून, हृदयापासून काही नसते. मी मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला सांगतो की, या संगळ्या मंत्र्यांच्यामध्ये म्हणजे अगदी यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंत शिवाजी महाराजांची तलवार आणण्यासाठी कोणी प्रयत्न केला असेल तर ते अब्दुल रेहमन अंतुले यांनी केला. मला असे जाणवते की, जगभरात सगळ्या म्युझियममध्ये, वस्तुसंग्राहलयामध्ये इतक्या वस्तू जतन करून ठेवल्या आहेत की, आपल्याकडे दुर्देवाने त्या नाहीत. येथे पंढरपूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या चिपळ्या आहेत. पण किती लोकांना त्यांचे दर्शन घेता येते? तर मला समितीला सांगायचे आहे की, आता तुम्हाला 76 कोटीचा जो निधी मिळालेला आहे. तो मंदिरापुरता सीमित आहे. तुम्ही तसे करू नका. एक लक्षात ठेवा की, मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना त्यांनी नांदेड शहरातील गुरु ता गद्दीला म्हणजे शिखांच्या गुरुद्वारसला 700 वर्षे पूर्ण झाली म्हणून केंद्राकडे पत्र व्यवहार केला. केंद्राकडून दोन हजार कोटी मिळविले. त्यावेळी सुदैवाने नियोजन मंडळाचे अध्यक्ष माँटेकसिंग अहलूवालीया आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग होते. त्यांनी नांदेडसाठी भरभरून दिले. त्यामुळे नांदेड शहराचा प्रचंड विकास झाला. मला पंढरपूरच्या बाबतीतही तेच करायचे आहे. पंढरपूरमध्ये धर्माधिष्टीत अधिष्ठान आहे.
या अधिष्ठानापासून स्फूर्ती घेऊन या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले, शिवाजी महाराजांसारखे स्वातंत्र्यप्रेमी झाले. ही सगळी या विठोबाची कृपा आहे. दुसर्या कुठल्या भूमीत असे झाले का? आज इतके वारकरी चालत उन्हातान्हात येतात. कुठल्याही दुसर्या देवाला जातात का? तुम्ही या मंदिरापुरते बघू नका. मला एक फार विदारक चित्र दिसते. आपल्या चंद्रभागा नदीची इतकी दुरवस्था झाली आहे की बस्स. नांदेडला जसा नदीचा घाट सुंदर केला आहे तसाच हा चंद्रभागेचा घाटही चांगला व्हावा, चांगला बांधला जावा. या दृष्टिकोनातून देवस्थानच्या पदाधिकार्यांनी, पत्रकारांनी प्रयत्न करायला हवेत. आपण तीर्थक्षेत्र विकास आराखडा फक्त मंदिर म्हणून करू नका, तर पूर्ण शहराचा विकास आराखडा करा. तो तुम्ही महाराष्ट्र शासनाकडे पाठवा. महाराष्ट्र शासन एवढे पैसे देऊ शकत नाही. तो केंद्राकडे जाईल. आणि मी तुम्हाला ग्वाही देतो की, पंतप्रधानांना भेटून नरेंद्र मोदी यांच्याकडून निश्चिमपणे हवी तितकी रक्कम मी मंजूर करून आणेन. यातून मी ज्यावेळेस पुढच्या खेपेला येईल, त्यावेळेस मला मंदिराचे रूप आणखी पालटलेले दिसेल.
डॉ. जाधव म्हणाले या मंदिर समितीने खरोखरच इतके दैदिप्यमान काम केले आहे. समितीच्यावतीने असेच काम व्हावे आणि आपल्याला या पंढरपूरचे बदललेले रुपडे पाहण्यास मिळू दे. तिरुपती बालाजी, शिर्डी साईबाबा या मंदिराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. हजारो कोटी जमतात ते दुसर्याला दान करतात. महाराष्ट्रातही इतके मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या कंपन्यांकडून सी. एस. आर. फंड की, जो सामाजिक संस्थेला द्यायचा असतो तो कोटी कोटींचा असतो. तो देखील आपल्याला मिळविता येतो. म्हणजे कुठलीही गोष्ट मिळवणे अवघड नाही. तर आपण सर्वांनी हे काम करावे. आपण या ठिकाणी मला बोलवले. याबद्दल मी आभारी आहे.
श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष औसेकर महाराज म्हणाले, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना, याप्रमाणे मंदिर हे पुढील सातशे वर्षे सुरू राहावे म्हणून काम सुरू आहे. याकरिता 74 कोटी रुपये निधी शासनाने दिला आहे. पंढरपूर येथे रोज भाविकांचा ओढा आहे. मंदिर समितीचे सर्व कर्मचारी कायम झाले. त्यांना सहावा वेतन आयोग लागू झाला आहे. मंदिर जतन व संवर्धनाचे काम चालू आहे. येणार्या काळात वारकर्यांना अधिकाधिक सेवा दिल्या पाहिजेत. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना मूलभूत सेवा देणे गरजेचे आहे. पाणी, अन्नदान, कुलर, खिचडी, लाऊस्पिकर, सुरू असतात. शासनाचा आराखडा चांगला आहे. येत्या सात जुलैपासून 24 तास दर्शन सुरू करत आहोत. पांडुरंगाला आपण जसे श्वास समजतो तसे आपण पत्रकारांना पांडुरंग समजतो. मंदिर समितीवर विश्वास ठेवून शासनाने संवर्धनाचे काम सोपवले आहे. त्यामुळे सर्व वारकर्यांसाठी चांगले काम करण्यास आम्ही प्राधान्य देत आहोत.
या दरम्यान, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संदर्भात वार्तांकन करणार्या पत्रकारांचा संघाच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार पत्रकारांच्यावतीने करण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहीनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे, ह. भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगीरे, अॅड. माधवी निगडे, डॉ. दिनेशकुमार कदम, प्रकाश जवंजाळ, शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सोलापूर आवृत्तीचे असि. निवासी संपादक संजय पाठक, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक महेश खिस्ते यांनी केले.