सोलापूर : पक्षांचे दुर्लक्ष… आमदारांचे बारीक लक्ष… | पुढारी

सोलापूर : पक्षांचे दुर्लक्ष... आमदारांचे बारीक लक्ष...

महेश पांढरे; सोलापूर

जिल्ह्यातील नव्याने स्थापन झालेल्या पाच आणि मुदत संपलेल्या जवळपास 9 नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. या निवडणुकांकडे स्थानिक राजकीय पक्षांसह राष्ट्रीय पक्षांनीही दुर्लक्ष केले असले तरी स्थानिक आमदारांनी मात्र यावर बारीक लक्ष ठेवले असून आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला फटका बसू नये, याची पुरती दक्षता स्थानिक आमदारांनी या निवडणुकीत घेतल्याचे दिसून येत आहे.

सध्या पाच नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला आहे. यामध्ये येत्या 21 डिसेंबरला मतदान, तर 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना मोठे स्वारस्य असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांनी मात्र या निवडणुकांना म्हणावे तसे मनावर घेतल्याचे दिसून येत नाही. सध्या वैराग, माळशिरस, नातेपुते, मोहोळ आणि श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विरोधात भाजप अशीच लढत होणार असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मोहोळ नगरपंचायतीमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार की, शिवसेना व भाजप एकत्र येणार, याविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

वैराग ही ग्रामपंचायत होती. त्याठिकाणी आता निवडणूक लागली आहे. त्याठिकाणी स्थानिक आघाडीविरोधात विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटात टक्कर होणार, अशी परिस्थिती दिसून येत आहे. श्रीपूर-महाळुंग आणि नातेपुते, माळशिरस याठिकाणी मात्र भाजपचे मोहिते-पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्यातच लढत होणार आहे. त्यामुळे या पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राजकीय आणि राष्ट्रीय प्रश्न यांना अधिक महत्त्व राहिलेले नाही. त्यामुळे या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरच लढल्या जाणार आहेत, हे यावरूनच स्पष्ट झाले आहे.

याठिकाणी स्थानिक नेत्यांच्या कामांचा आणि जनमताचा कौल लागणार आहे. या निवडणुका राजकीय पक्षांच्याद़ृष्टीने महत्त्वाच्या नसल्या तरी स्थानिक आमदारांना मात्र यामध्ये मोठे स्वारस्य असल्याचे दिसून येत आहे. येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपल्याला दगाफटका होऊ नये यासाठी या निवडणुकांची मोठी व्यूहरचना आमदारमंडळींनी सुरू केली आहे. स्थानिक आमदारांच्याविरोधात ही निवडणूक लढलेल्या आणि पराभूत झालेल्या गटाने मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेकांचा विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी पराभव झाला होता. अशा अनेक मंडळींनी आता या नगरपंचायतींच्या निवडणुकीत कंबर कसली आहे. येणार्‍या निवडणुकीत आपल्याला हातभार लागेल, या भावनेने त्यांनी व्यूहरचना आखली आहे.

पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना मात्र याठिकाणी अडचणी येत आहेत. त्यामध्ये माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते, मोहोळचे आमदार यशवंत माने हे त्या-त्या मतदारसंघांत पहिल्यांदाच निवडून आले आहेत.त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा गट सक्रिय नसल्याने त्यांना पूर्वी ज्या नेत्यांचे गट या निवडणुकांमध्ये सक्रिय आहेत त्यांच्याच पाठीशी उभे राहून ताकद द्यावी लागणार आहे. पूर्वीच्या सक्रिय गटातही मतभेद असल्याने ते मतभेद मिटविण्यासाठी आता स्थानिक नेत्यांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे.

राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांना मोठे महत्त्व

जिल्ह्यातील मोहोळ, माळशिरस, वैराग, नातेपुते, श्रीपूर-महाळुंग या नगरपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या राष्ट्रीय पक्षांपेक्षा स्थानिक आघाड्यांना मोठे महत्त्व आहे. या नगरपंचायतींमध्ये स्थानिक नेतेमंडळींचा मोठा प्रभाव असल्याने त्यांची जी भूमिका असेल त्या बाजूने मतदार कौल देतात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये स्थानिक आघाड्यांना महत्त्व आले असल्याचे दिसत आहे.

तरीही राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा गाजणार

नगरपंचायतींच्या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर होणार असल्या तरीही भाजपने राज्यस्तरीय नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्या प्रचार सभा जिल्ह्यात घेण्याचे नियेाजन केले आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्ष वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा घेणार असल्याने यामध्ये आरोप-प्रत्यारोप होणार आहेत. यामुळे या निवडणुकांना चांगलीच रंगत येणार आहे. विधान परिषद निवडणूक पुढे गेल्याने बहुतांश जणांचा हिरमोडही झाला आहे.

Back to top button