

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा सोलापूर शहरातील अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्यांने रेल्वे समोर येऊन जीवन संपवले. सचिन श्रीमंत चौधरी (वय 23 वर्ष) असे जीवन संपवलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सचिन चौधरी हा मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून, सोलापुरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात तो एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. कुटुंबातील पहिला मुलगा जो डॉक्टर होणार होता, घरच्यांना त्याच्यावर खूप अभिमान होता. पण, सारी स्वप्न अर्ध्यावर सोडून त्याने आपल्या आयुष्याची अखेर केली.
सचिन चौधरी याने असे का केले किंवा जीवन का संपवले याचे कारण अद्यापही समोर आले नाही. वर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. सचिन हा मित्र मंडळीत चाहता होता, त्यामुळे सचिनच्या वर्गातील वर्ग मित्रांना दुःख अनावर झाले होते. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हॉस्टेलमधून तो गुपचूप निघून गेला आणि होटगी रस्त्यावरील पुलाखाली गेला, तिथे रेल्वेसमोर उडी मारून आपले जीवन संपवले. रेल्वे रूळावर सचिनचे मृत शरीर पडले होते.
घरात पहिला डॉक्टर होणार होता सचिन…
सचिन चौधरी हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. सचिनचे वडील श्रीमंत चौधरी छत्रपती संभाजीनगर येथे शेती करतात. घरात सचिन हा मोठा मुलगा होता. बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर लाखो रूपये फी भरून कुटुंबीयांनी सचिनला अश्विनी मेडिकल कॉलेज सोलापूर येथे दाखल केले होते. सचिन हा घरात पहिलाच डॉक्टर होणार होता. प्रथम वर्षांत सुद्धा सचिनने चांगले गुण मिळवले होते. वर्गात सर्वांशी तो हसतखेळत राहत होता. हॉस्टेलमध्ये देखील सचिनचा स्वभाव उत्तम होता. रविवारी सकाळी त्याने होस्टेलमध्ये झोपेतून उठल्यावर मित्राचे दुचाकी वाहन घेतले. शहरा जवळ असलेल्या होटगी गावा जवळ जाऊन त्याने धावत्या रेल्वे एक्सप्रेस समोर उडी मारली.
मृत्यूची वार्ता ऐकताच अश्विनी मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांना धक्का…
अश्विनी मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिकत असलेल्या सचिन चौधरी याने रेल्वे समोर उडी मारुन जीवन संपवल्याची वार्ता ऐकताच विद्यार्थ्यांना जबर धक्का बसला. वळसंग पोलिसांनी पंचनामा करून सचिनचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल केला. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सचिनच्या वर्ग मित्रांनी दुःख व्यक्त करत शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. वडील श्रीमंत चौधरी यांना देखील माहिती देण्यात आली असून, औरंगाबाद येथून सोलापूरकडे ते रवाना झाले आहेत.
हेही वाचा :