कोजागरी पौर्णिमेदिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचा तब्बल 37 वर्षांनी योग; जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगते | पुढारी

कोजागरी पौर्णिमेदिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचा तब्बल 37 वर्षांनी योग; जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगते

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. 28) खंडग्रास चंद्रग्रहण असून रात्री एक वाजून पाच मिनिटे ते दोन वाजून 23 मिनिटे असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. यापूर्वी 17 ऑक्टोबर 1986 रोजी कोजागरीचे दिवशी चंद्रग्रहण आलेले होते. म्हणजे तब्बल 37 वर्षांनतर हा योग आला आहे, अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार मोहन दाते यांनी दिली.

दरम्यान, ग्रहण काळ असला तरीही तुळजापूरमध्ये श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुरु असणार असल्याची माहिती देवस्थान समीतीने जाहीर केली आहे. शनिवारी (दि. 28) दुपारी तीन वाजून 14 मिनिटांपासून पासून या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या सुरू होणार्‍या वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल. मात्र प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसर्‍या दिवशी घेता येईल. तसेच देवतांची सायंकाळची पूजा, आरती, पालखी इत्यादी सर्व वेधकाळात करता येते. कोजागरीचे दिवशी मुलांना औक्षण केले जाते, ते वेधकाळात सुध्दा करता येईल, याविषयी कोणतीही अंधश्रद्ध बाळगू नये असेही पंचागकर्ते दाते यांनी कळवले आहे.

ग्रहणाविषयी विशेष तपशील…

– आश्विन शु. 15, दि. 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार
– ग्रहणस्पर्श – रात्री 1:05 ग्रहणमध्य – रात्री 1:44 ग्रहणमोक्ष – रात्री 2:23
– 28 ऑक्टोबर 2023, शनिवारी भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल. हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.

ग्रहणाचा वेध

शनिवारी (दि. 28) दुपारी 3:14 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं. 7:41 पासून वेध पाळावेत. वेधकाळामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहकाळात म्हणजे रात्री 1:05 ते 2:23 या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग हे करू नयेत.

ग्रहणातील कृत्ये

ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे. ग्रहण काळामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन व कामविषयसेवन हे कर्म करू नये. सुतक असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते.

मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफल देणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. सिंह, तुला, धनू, मीन या राशींना मिश्रफल. मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फल आहे. ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
– ओंकार मोहन दाते, पंचांगर्कर्ते

हेही वाचलंत का?

Back to top button