

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा ऊस बिले अदा करा; अन्यथा गळीत हंगामास परवानगी देणार नाही, अशी तंबी साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत गुलकुंडवार यांनी बैठकीत देताच करमाळा तालुक्यातील 'मकाई' व 'कमलाभवानी' या दोन साखर कारखान्यांनी 30 सप्टेंबरच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याची हमी दिली. गळीत हंगाम पूर्ण होऊन 7 ते 8 महिने झाले, तरी करमाळा तालुक्यातील 'मकाई' व 'कमलाभवानी' या दोन कारखान्यांनी शेतकर्यांची बिले अदा केली नाहीत. या कारखान्याच्या विरोधात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील साखर संकुल येथे आंदोलन करण्यात आले. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास आंदोलकांनी साखर संकुल कार्यालयात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. परंतु कार्यकर्त्यांनी शांत न राहता गर्दीचा वाढता दबाव पाहता भिक मागो आंदोलन सुरु करुन गेटवर ठिय्या मारला.
शेतकर्यांचा दबाव पाहून साखर आयुक्त डॉ. गुलकुंडवार यांनी मकाईचे चेअरमन भांडवलकर, कार्यकारी संचालक खाटमोडे, कमलाईचे कार्यालयीन अधीक्षक यांच्यासोबत जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांच्यासह शेतकर्यांची समारोसमोर बैठक लावली. या बैठकीत शेतकर्यांनी अक्षरशः डोळ्याला पाणी आणून व्यथा मांडली. तेव्हा साखर आयुक्त यांनी कारखानदारांना चांगलेच धारेवर धरले. बिले न दिल्यास गळीत हंगामाची परवानगी मिळणार अशी तंबी देताचा कारखान्यांनी 50 टक्के बिले आठवड्याभरात तर इतर सर्व बिले 30 सप्टेंबरच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्याची हमी दिली.
यावेळी विनिता बर्फे, शर्मिला नलवडे, गणेश वायभासे, राणा वाघमारे, अनिल शेळके, अतुल राऊत, शरद एकाड, बिभीषण शिरसाट, दीपाली डिरे, किशोर शिंदे, अजीज सय्यद, साहेबराव इटकर, बालाजी तरंगे, वैभव मस्के, रणजित पवार, हनुमंत कांतोडे, विजय खूपसे, रेश्मा दिवे, श्रावणी दिवे, रुक्मिणी शिंदे, भाऊसाहेब जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.