सोलापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट | पुढारी

सोलापूर जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा गेल्या अनेक दिवसांपासून शहर-जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे शहरी भागात अगदी उन्हाळ्यासारखा उकाडा भासू लागला आहे. ग्रामीण भागामध्ये सुरुवातीच्या पावसावर पेरणी केलेल्यांचे बियाणे करपून गेल्याने दुबार पेरणीची त्याच्यावर वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून सोलापूर शहर-जिल्ह्यात म्हणावा तसा एकही दमदार पाऊस झाला नाही. मध्यंतरी काही काळ सलगपणे तीन-चार दिवस पावसाची रिपरिप लागून होती. त्यानंतर उघडीप घेतलेल्या पावसाने सोलापूरवर आपली खप्पामर्जी केली आहे. पावसाअभावी सर्व जलस्रोत निम्मेही भरले नाहीत. यामुळे जर हीच परिस्थिती कायम राहिली तर शहर-जिल्ह्यावर दुष्काळाचे भीषण संकट येऊ शकते, अशी सद्य:स्थिती आहे.

उजनी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा बंद

जोवर उजनी धरण 70 टक्के भरत नाही तोवर धरणातून यापुढे शेतीसाठी पाणी सोडण्यात येणार नाही, असा निर्णय आज (बुधवारी) लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठांनी घेतला आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. सध्या उजनी धरणात फक्त 13 टक्के जलसाठा आहे. वरील धरणातून उजनीत पाणी येणे सध्या बंद आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Back to top button