

करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 62 उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी गुरुवारी (दि. 17) 60.79 टक्के मतदान झाले.
गुरुवारी सकाळपासून संथगतीने व शांततेने मतदान सुरू होते. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली. आदिनाथ कारखाना निवडणुकीत झालेल्या मतदानामध्ये 17 हजार 654 मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये 15 हजार 224 पुरुष तर दोन हजार 430 महिला मतदारांचा समावेश आहे. आदिनाथ कारखान्याच्या एकूण सभासद संख्येमध्ये करमाळा तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील 12 गावांचा समावेश आहे. ऊस उत्पादक गट व संस्था मतदारसंघांमधून 350 मतदार आहेत. एकूण 29 हजार 49 मतदार या निवडणुकीसाठी मतदार आहेत.
सकाळी आठ ते पाच या वेळेत मतदान सुरू होते. सकाळी 10 वाजता 12.86 टक्के, 12 वाजता 27.70 टक्के, 2 वाजता 40.10 टक्के तर 4 वाजेपर्यंत 52.17 टक्के मतदान झाले होते. 29 हजार 41 मतदारांमधून 15 हजार 151 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत कसलाही अनुचित प्रकार घडला नसून पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शनिवारी (दि. 19) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. यावेळी 72 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. यासाठी 288 कर्मचार्यांची नेमणूक केली आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व निकाल येणे अपेक्षित आहे. प्रथम संस्था मतदारसंघाचा निकाल येणार आहे.