सोलापूर : चिनी वस्तूंना फाटा… स्वदेशीचा लळा.. | पुढारी

सोलापूर : चिनी वस्तूंना फाटा... स्वदेशीचा लळा..

संतोष आचलारे; सोलापूर पुढारी वृत्तसेवा

जगभरात कोरोना पसरविण्यात चीन देशच दोषी आहे. त्यामुळे चीनविरोधात भारतासह जगभरात रोष पसरला गेला आहे. दरवर्षी दिवाळीत चिनी वस्तूंना स्वस्त म्हणून ग्राहकांची पसंती मिळत होती. मात्र कोरोना परिस्थितीस चीनच जबाबदार असल्याने दिवाळीत स्वदेशी बनावटीच्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन सर्वच स्तरांतून करण्यात येत आहे. सोलापूर मध्ये यास ग्राहकांचाही प्रतिसाद मिळत आहे. यामुळे चिनीवर बहिष्कार, तर स्वदेशीचा पुरस्कार होत असल्याचेच सर्वच स्तरांतून अंमलबजावणी होत आहे.

दिवाळीनिमित्त सोलापुरातील बाजारपेठांत खरेदीसाठी ग्राहकांची लगबग वाढली आहे. यंदा चिनी वस्तू खरेदी करणे ग्राहक टाळत आहेत. 30 रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंत बनलेल्या भारतीय बनावटीच्या पणत्या, आकाशकंदील, लायटिंग माळा खरेदी करण्यास ग्राहकांची पसंती मिळत आहे. सोलापुरातील अशोक चौक, टिळक चौक, मधला मारुती, नवी पेठ, आसरा चौक, जुळे सोलापूर आदी परिसरात दिवाळीसाठी आवश्यक असणार्‍या विविध वस्तूंची विक्री करणारे स्टॉल सजले आहेत.

रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलवरील स्वदेशी वस्तू खरेदी करताना सोलापूरकरांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. दिवाळीनिमित्त यापूर्वी चिनी मातीच्या पणत्या व प्रकाश देणार्‍या माळांना मोठी मागणी होती. चीनविरोधात रोष असल्याने चिनी वस्तू खरेदी करणे बहुतांश ग्राहक टाळत आहेत. स्थानिक लाल मातीपासून बनविलेल्या पणत्या व रंगीबेरंगी कागदांपासून बनविलेले आकाशकंदील खरेदीस सोलापूरकरांची पसंती मिळत आहे. चिनी वस्तूंना रास्त दरात विविध प्रकारच्या स्वदेशी वस्तूंचा पर्याय ग्राहकांसमोर आहे. स्थानिक लाल मातीपासून बनविण्यात आलेल्या पणत्या 40 ते 60 रुपये डझनपर्यंत उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी कागदांपासून व प्लास्टिकपासून बनविलेले आकाशकंदील 30 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

स्वस्त पर्याय म्हणून चिनी माळांना सर्वाधिक पसंती देण्यात येत होती. यंदा स्वदेशी माळा बाजारात उपलब्ध झाल्यव असून या माळाही फक्‍त 100 ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध होत आहेत. सौरऊर्जेवर चालणारे स्वदेशी आकाशकंदील, पणत्याही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेत महिला बचत गटांचे दिवाळी स्टॉल

दिवाळी सणात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेत दिवाळी खरेदीचे स्टॉल सुरु करण्यात आले आहेत. याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते बुधवारी दुपारी येथील स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी यासाठी पुढाकार घेत महिला बचत गटांसाठी स्टॉल उभारण्याची संकल्पना पुढे आणली. यावेळी उमेद योजनेच्या जिल्हा समन्वयक मीनाक्षी मडवळी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या आवारातच सुमारे 10 महिला बचत गटांनी दिवाळीसाठी आवश्यक असणार्‍या वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल लावले आहेत. सौंदर्य प्रसाधने, आकाशकंदील, फराळाचे साहित्य व गिप्ट आयटम आदी प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती मिळत आहे. दिवाळीच्या गोड पदार्थांसह बचत गटांनी उत्पादित केलेल्या खंमग पदार्थांचीही मेजवानी ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

आवारातच सदस्यांची खरेदी

बचत गटांनी लावलेल्या स्टॉलमधून रास्त दरात दिवाळीसाठी आवश्यक वस्तू मिळत असल्याने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी, सदस्य व कर्मचारी यांच्याकडूनही याठिकाणी खरेदीसाठी लगभग दिसून येत आहे.

चिनी वस्तूंची विक्रीच केली बंद

कोरोना परिस्थिती जगभरात निर्माण करण्यास चीनच जबाबदार आहे. हे जगाला कळाले आहे. त्यामुळे चीनविरोधात जगभरात रोष आहे. दिवाळी सणात चिनी उत्पादनांची क्रेझ होती. मात्र बहुतांश व्यापार्‍यांनी चिनी उत्पादनांची विक्री करणेच बंद केली आहे. रास्त दरातील स्वदेशी वस्तू ग्राहकांनी खरेदी कराव्यात, असे आवाहन टिळक चौकातील स्टॉलधारकांकडून करण्यात येत आहे.

फुकटात दिली तरी चिनी वस्तू घेणार नाही

कोरोना परिस्थितीमुळे चीनविरोधात सर्वत्र प्रचंड रोष आहे. यापूर्वी भारतीयांनीच चिनी वस्तूंची खरेदी करुन चिनी अर्थव्यवस्था मजबूत केली. आता मात्र परिस्थिती बदलली असून चीनविरोधात भारतीयांच्‍या मनात रोष आहे. फुकट दिली तरी चिनी वस्तू आम्ही घेणार नाही, अशी प्रतिक्रिया किशोर म्हमाणे यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button