

करमाळा; तालुका प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या अनपेक्षित व अभूतपूर्व बंडानंतर करमाळा शहर व तालुक्यात एक प्रकारचा सन्नाटा झाला आहे. अजितदादा समर्थक विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनीही सुरूवातीला मौन बाळगत व नंतर अजितदादा हेच आमचे नेते असून त्यांच्यासोबत आम्ही जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र एकही पदाधिकारी अजितदादा समर्थक म्हणून यायला तयार नाहीत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 30 ते 40 आमदार घेऊन केलेल्या बंडानंतर करमाळा शहर व तालुक्यात कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही. करमाळा शहरातील तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, संतोष वारे, शहराध्यक्ष शिवराज जगताप विविध सेलचे पदाधिकारी, महिला आघाडी आदी पदाधिकाऱ्यांनी अतिशय शांतपणे राहत सुरूवातीला कसलीही प्रतिक्रिया दिली नाही. नंतर मात्र सर्वच पदाधिकारीनी आम्ही पक्षासोबत अर्थात शरद पवार यांच्या बरोबर असल्याचे सांगितले. त्यामुळेच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन ही कार्यकर्ते व पदाधिकारीनी साधा फटाकाही फोडला नाही. याउलट सर्व पदाधिकारींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याशी संपर्क केला. मुंबई येथे होणाऱ्या पाच जुलै रोजीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय बैठकीसाठी उपस्थित राहत असल्याचेही सांगितले आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व करमाळ्यातील मकाई कारखान्याचे माजी चेअरमन आप्पासाहेब झाजुर्णे यांनी मात्र आपण देशाचे नेते शरद पवाराच्या सोबत असल्याचे ठामपणे सांगितले.
अजित पवार यांनी बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतल्याची खबर करमाळ्यात पोहोचली असता पदाधिका-यांमध्येही मोठी द्विधा मनस्थिती झाली होती. पदाधिकाऱ्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी फटाकडे वाजवणे तर दूरच आनंद ही व्यक्त केला नाही. यावरूनच त्यांची संभ्रमावस्था लक्षात आली. सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सोबत असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी आता सांगितले आहे . तर याउलट विद्यमान अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांनी मात्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याप्रमाणे करमाळा शहर व तालुक्यात अधिकृत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सक्षम नेतृत्वच करमाळ्यात राहिलेले नाही.
2014 मधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल कोलते यांना अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देण्यास विरोध होता. अजित पवार यांचा विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे उमेदवारी देण्याचा कल असल्याने रश्मी बागल कोलते यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता. ज्या प्रमाणे अजित पवारांनी बागल गटाची कोंडी केली त्याचप्रमाणे रश्मी बागल कोलते यांनीही शिवसेना प्रवेश करून अजितदादाचीही कोंडी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची करमाळ्यात मोठी कोंडी झाल्याने राष्ट्रवादी ला आजपर्यंत नेतृत्त्वच राहिले नाही. अजितदादा समर्थक असुनही अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व स्विकारले नाही. अजित पवार यांचा विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना सततचा पाठिंबा आहे. संजयमामा शिंदे हे अजित पवाराचे समर्थक आहेत. मात्र अजित पवारांच्या रश्मी बागल कोलते यांना तिकीट न देण्याच्या भूमिकेने राष्ट्रवादी काँग्रेसची जबरदस्त गोची झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तिनतेरा झाले. बागलानी पक्षाला रामराम ठोकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळाला नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक असलेले संजयमामा शिंदे हे अपक्ष उमेदवार होते. सक्षम उमेदवार नसल्याने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी रद्द करून अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना पुरस्कृत करून पाठिंबा देण्याची नामुष्की व दयनीय परिस्थिती अजित पवारावर ओढावली होती.
सध्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या बंडाने निर्माण झालेल्या परिस्थितीने पुन्हा राजकिय गणिते बदलताना दिसत आहेत. आज पुन्हा होत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडी मध्ये सध्यातरी नवीन आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हे अजित पवारांच्या साथीला जात नसल्याचे दिसत असून विद्यमान आमदार मात्र हे अपेक्षित पणे अजित पवारांच्या बरोबर आहेत.
आजही त्यांच्या माढा तालुक्यातील निमगाव येथे ते ठाण मांडून बसलेले असले तरी ते उद्या ते मुबंई कडे कूच करत मंत्री मंडळाच्या गोट्यात नक्कीच मिसळतील असे चित्र आहे.