राष्ट्रवादी घेऊन भाजप वाढविणार सोलापूर शहरातील वर्चस्व; ग्रामीण भागातही दबदबा | BJP dominates in Solapur | पुढारी

राष्ट्रवादी घेऊन भाजप वाढविणार सोलापूर शहरातील वर्चस्व; ग्रामीण भागातही दबदबा | BJP dominates in Solapur

सोलापूर; जाकिरहुसेन पिरजादे : राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या ३५ आमदारांचे समर्थन घेऊन सत्तेत सहभागी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील अजित पवार समर्थकांना बळ मिळणार आहे. राष्ट्रवादीला बरोबर घेतल्याने भाजपचा सोलापूर शहरबरोबरच ग्रामीण भागात दबदबा वाढणार आहे. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात येणार आहेत.

ऐकेकाळी राष्ट्रवादीची सोलापूर जिल्ह्याचा बालेकिल्‍ला म्हणून ओळख होती. विशेषता ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका आणि मोहोळ, करमाळा, माढा तालुक्यात, उत्तर सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादीचा दबदबा अद्यापही कायम आहे मात्र अजित दादांच्या बंडामुळे शरद पवार आणि अजित पवारांच्या समर्थकातही फूट पडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना जुने नेते अधिक मानतात तर अजित पवारांना मानणारा तरूणवर्ग आहे. अजितदादांचा स्वभाव जरी फटकळ असला तरी त्यांना मानणारा वर्ग सोलापूरातही अधिक आहे.

मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी अजितदादांना पाठिंबा दिला, तर आमदार बबनदादा शिंदे यांनी दोन्हीकडे असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पवारांच्या बंडामुळे अजित पवार समर्थकांना बळ मिळणार आहे. भाजपसोबत गेल्यामुळे विकास निधीही लवकर मिळणार आहे. येणार्‍या सर्वच निवडणुकीतही भाजपसोबत असल्यामुळे नक्‍कीच राष्ट्रवादीच्या अजितदादा गटास फायदा होणार एवढं मात्र निश्‍चितं. आता भाजप राष्ट्रवादीला सोबत घेऊन सोलापूर शहराबरोबरच ग्रामीण भागही भाजपमय करणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

पालकमंत्र्याविना सोलापूर पोरकाच राहणार

काही दिवसातच मंत्रीमंडळ विस्तार होणार होता त्यामुळे सोलापूर जिल्हला सोलापूरातील हक्‍काचा पालकमंत्री मिळण्याची शक्यता होती. मात्र अजितदादांच्या बंडामुळे भाजपाने शिंदे गटाच्या शिवसेनेतील मंत्रीपद राष्ट्रवादीला दिल्यामुळे आता लवकरच होणार्‍या मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूरला मंत्री मिळणार का नाही याची शक्यता कमीच असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे यंदाही सोलापूरातील हक्‍काचा पालकमंत्री न मिळाल्यामुळे सोलापूर पोरकाच राहणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू आहे.

Back to top button