सोलापूर विद्यापीठास इमारत बांधकामासाठी ११ कोटींचा निधी मंजूर | पुढारी

सोलापूर विद्यापीठास इमारत बांधकामासाठी ११ कोटींचा निधी मंजूर

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधकामासाठी अकरा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. निधी वितरित करण्याचा शासन निर्णय शुक्रवारी (दि.९) महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून काढण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी दिली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधकामासाठी हिवाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५४ कोटी १९ लाख २५ हजार ४५३ रुपयांस दि. १० मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून शासनाकडे निधी देण्याची विनंती केली होती. वित्त विभागासही उच्च व तंत्र शिक्षण विभागाने विनंती केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत व परीक्षा भवन बांधकामासाठी ११ कोटी रुपये निधी वितरित करण्याचा शासन निर्णय शुक्रवार ९ जून २०२३ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून काढण्यात आलेला आहे. या निधीमुळे मुख्य प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन बांधकामाच्या कामाला चालना मिळेल, असा विश्वास प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांनी व्यक्त केला आहे.

याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि वित्त विभागातील अधिकाऱ्यांचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे आणि कुलसचिव योगिनी घारे यांनी आभार मानले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button