Earthquake : सोलापुरात भूकंपाचे धक्के; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सतर्क | पुढारी

Earthquake : सोलापुरात भूकंपाचे धक्के; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सतर्क

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही ठिकाणच्या परिसरात १.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. हा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण शमा पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव, होटगी स्टेशन, मंद्रुप, हिपळे, फताटेवाडी, औज आहेरवाडी, तिल्हेहाळ, कणबस व बोरूळ या परिसरामध्ये आज दि. २९ मे२०२३ रोजी दुपारी १.२० वाजेच्या दरम्यान सौम्य आवाज ऐकू आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची बाब तहसिलदार दक्षिण सोलापूर यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निदर्शनास आणून आणून दिली. सदर बाबीची पडताळणी करिता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी, नवी दिल्ली यांच्याकडे शहानिशा केली असता, सोलापूर शहर (वालचंद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी) परिसरातील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या भूकंप मापक स्टेशनमध्ये १.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली असल्याचे सांगितले.

तरी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त स्केलचा भूकंप खूप कमी तीव्रतेचा असल्याने कोणतीही जीवित व वित्त हानी झालेली नाही. तरी नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button